पुणे : कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्यासह सहा जणांना जमीन मंजूर झाला आहे. विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी यांचा जामीन मंजूर केला आहे. खून आणि नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुंड बंडू आंदेकर टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली होती.
सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर, कृष्णराज ऊर्फ कृष्णा सूर्यकांत आंदेकर, तुषार निलंजय वाडेकर, स्वराज ऊर्फ शक्ती निलंजय वाडेकर, पुराराम ऊर्फ रामाराम दीपाराम गुज्जर आणि आकाश ऊर्फ पैलवान रामदास खरात अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत.
समर्थ पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजी निखिल आखाडे यांचा खून केलेल्या आरोपासह अनिकेत ज्ञानेश्वर दूधभाते यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी या सर्व आराेपींना अटक करण्यात आली होती. अप्पर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी मोक्का कायद्याचे कलम लावण्याची मान्यता दिली होती. त्यानुसार समर्थ पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी आरोपींवर मोक्काची कारवाई केली होती. याप्रकरणी ॲड. बिलाल शेख यांनी आरोपींतर्फे जामीन अर्ज दाखल केला होता.