पुणे : दारु पिण्याच्या बहाण्याने इंद्रायणी नदीच्या कडेला टेहाळणी बुरुजाच्या जवळ नेऊन दगडाने ठेचून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना जांभूळ (ता. मावळ) हद्दीत सन २०१९ साली घडली होती. या गुन्ह्यातील एका आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला असून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कर्णिक जे यांनी हे आदेश दिले आहेत.
स्वप्नील मधुकर सुतार (वय २०, रा. शिव कॉलनी, वराळे ता. मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बाबा ऊर्फ साहिल लक्ष्मण शिंदे, सौरभ जालिंदर खेडेकर, अमित बाळासाहेब साठे आणि साहिल अभिजीत म्हाळसकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी बाबा ऊर्फ साहिल लक्ष्मण शिंदे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरु होता. या गुन्ह्यातील आरोपी शिंदे याने शैलेश खरात आणि विपुल दुशिंग या वकिलांमार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या खटल्यात खरात आणि दुशिंग या दोन वकिलांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी शिंदे याला जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, या खटल्यात वकील शैलेश खरात, विपुल दुशिंग यांना प्रणय महाजन, सौरभ दाभाडे, आणि भागवत तोरणे या वकिलांचे सहकार्य मिळाले.