पुणे, ता. १७ : बलात्कार व पोक्सोचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. राठोड यांनी याबाबतचा आदेश दिल्याची माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली.
ओमकार नंदु जाधव असे जामीन मंजूर करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर सहकारनगर पोलीस ठाण्यात बलात्कार व पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ७ मार्च २०२३ रोजी पीडित मुलगी ५ महिन्यांची गरोदर असताना जिना चढताना पडली होती. तेव्हा तिला नवले हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले होते. तेव्हा पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी ओमकार जाधव याच्याविरुद्ध बलात्कार व पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला सहकारनगर पोलिसांनी अटक करून दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर आरोपीची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.
येरवडा कारागृहात असताना आरोपीने अॅड. नितीन भालेराव यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आरोपी व पीडितेचे प्रेमसंबध होते. त्यानंतर प्रेमसंबंधानंतर त्यांचे एकमेकांबरोबर लग्न झालेले होते. आरोपीने कुठलेही गैरकृत्य केले नसल्याचे बचाव पक्षातर्फे सांगण्यात आले. उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या जामिनांचा दाखलाही देण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर सरकारी वकिलांचे व बचाव पक्षाचे म्हणणे ऐकून आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. राठोड यांच्या कोर्टाने दिल्याचे अॅड. नितीन भालेराव यांनी सांगितले. यासाठी अॅड. मयूर चौधरी, अॅड. मिथिल बुरुंडे, अॅड. ओमकार जगताप, अॅड. दीपक खेडकर यांनी मदत केली.