पुणे : तोरणा किल्ल्याकडे जाताना मिनी बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 25 पर्यटकांचे प्राण वाचले आहे तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली आहे.
निलेश प्रताप कदम (वय-50), संजय मधुकर पाटील (वय-49) (दोघेही राहणार बदलापूर) या अपघातात किरकोळ जखमी झालेले प्रवाशांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरमधील 25 पर्यटक हे मिनी बसमधून (एमएच 40, बीएल 5831) किल्ले तोरणा गडावर निघाले होते. त्यादरम्यान, पार्किंगच्या अलीकडे असलेल्या मोठ्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने चढावरुन मागे येत बस खोल दरीत कोसळली. यादरम्यान, शंभर फुटांवर झाडाला बस अडकल्यााने मोठी दुर्घटना टळली. बसमधील इतर पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिनी ट्रॅव्हलमधील त्यांची सहकारी सुरेंद्र मरळ यांनी दिली.
या अपघातात जखमी झालेल्या पर्यटकांवर वेल्हे ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी दिली.