पुणे : दुचाकीवर मंडई परिसरात सोडले नाही म्हणून दोघांनी मिळून एकाच्या पाठीत वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. रियाज लालासाहेब देवनगाव (वय ३१, रा. जनता वसाहत) असं अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार पैगंबर याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शहरातील शुक्रवार पेठ परिसरात घडली आहे.
याबाबत राजकुमार जगन्नाथ सगर (वय ४५, रा. आंबेगाव) हे चैतन्य हॉस्पिटलमध्ये अति दक्षता विभागात उपचार घेत असून तेथे खडक पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ८ सप्टेबर रोजी रात्री ८ वाजता आनंद मठासमोर दुचाकीवर बसले होते. त्यावेळी पैगंबर व रियाज आले. त्यांनी आम्हाला पुणे स्टेशनला जायचे आहे, तेथे नेऊन सोडा असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी मला पत्नीला आणण्यासाठी कल्पना हॉटेलला जायचे आहे. मी तुम्हाला मंडईपर्यंत सोडतो. येताना दगडुशेठ गणपतीचे दर्शन करुन पत्नीला घेण्यासाठी जातो, असे म्हणाले. तेव्हा ते तिघे रात्री दुचाकीवर निघाले. एस पी चौकापासून पुढे काळा हौद चौकापर्यंत ते आले. परंतु, पुढे खूप गर्दी असल्याने त्यांनी गाडी थांबविली.
गर्दी मुळे पुढे गाडी जाणार नाही असे ते म्हणाले. त्यांनी मंडईपर्यंत सोडणार होता, तेथे सोड असे ते म्हणाले. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला. त्यावर रियाज याने त्यांची गचांडी पकडून ‘तुला माहिती आहे का आम्ही कोण आहोत, तु परत कसा जिवंत जातोस,’ असे म्हणून रियाज याने कमरेला लावलेला चाकू काढून पाठीत वार केला.
त्यामुळे फिर्यादी गाडीवरुन खाली पडले. त्यांच्या पाठीतून रक्तस्त्राव होऊ लागल्याचे पाहून दोघे जण तेथून पळून गेले. फिर्यादी हे गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन रियाज याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करीत आहेत.