उरुळी कांचन, (पुणे) : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अयोध्येत सोमवारी (ता. २२) प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला. यावेळी उरुळी कांचनसह परिसरातील गावागावांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील घरांसह, संस्था व जागोजागी भगवे झेंडे, अनेक ठिकाणी भव्य फलक लावलेले होते. यामुळे संपूर्ण परिसर हा धार्मिक, भक्तिमय व राममय झाला होता. भगव्या रंगांचे कपडे व डोक्यावर टोप्या परिधान करुन जय श्रीरामाचा नागरिक जयघोष करत होते.
या ऐतिहासिक दिनानिमित्त उरुळी कांचन परिसरातील विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच महाउत्सवात सहभागी झाले होते. शाळा महाविद्यालयांसह सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे सर्वत्र वातावरणही आनंदमयी झाले होते. हा सोहळा लोकोत्सव असल्याने सजावटीसाठी बाजारपेठेत राममंदिराच्या प्रतिकृतीसह, झेंडे, पताका, टोपी, राम मूर्ती, स्टीकर, तोरण, कापडी झेंडे, हनुमान, श्रीराम, सीता यांचे स्टीकर अशा वस्तू परिसरात दिवसभर दिसून येत होत्या. तसेच काही ठिकाणी आकाश दिव्यांनी परिसर सजला होता.
उरुळी कांचन येथील श्री राम मंदिरात मागील आठ दिवसांपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेकांनी मंदिर व परिसरात स्वच्छता व साफसफाई केली होती. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ह.भ.प. चिंतामणी तारू महाराज यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. साडे बारा वाजण्याच्या सुमारास पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी राम मंदिरात दर्शानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
भाविकांना महाप्रसादाचे आयोजन
भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी तबला साथ सुरेश महाराज कांचन, मृदंग साथ शरद महाराज कुंभार, नारायण महाराज खंदारे, एकनाथ महराज तारू, वंदना काकडे यांची साथ लाभली. यावेळी उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, ज्येष्ठ नेते के. डी. कांचन, डॉ. एन. जी हेगडे, डॉ. अभिषेक देवीकर, माऊली कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, राजेंद्र कांचन, सदस्य अमित कांचन, युवराज कांचन, यांच्यासह ५ ते ६ हजार नागरिक उपस्थित होते.
श्रीरामचंद्राच्या मूतींची प्राणप्रतिष्ठापना
थेऊर येथील चिंतामणी मंदिरात डॉ. नीलिमा देशपांडे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच श्रीरामचंद्राच्या मूतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण चिंचवड देवस्थानच्या वतीने स्क्रीन एलईडीवर करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त स्वच्छता मोहीम, अभिषेक, कीर्तन, मिरवणूक, महाआरती, महाप्रसाद, दीपोत्सव, व संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायत परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन
कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीत श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा या निमित्ताने ग्रामपंचायत परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित असलेल्या नागरिकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच मंगेश कानकाटे, उपसरपंच वैशाली सावंत, भानुदास जेधे, सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.
कारसेवकांचा सन्मान
उरुळी कांचन रेल्वे स्टेशनचे सुपरीटेंड मोहनराव साल्लोडकर हे ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येमध्ये स्वतः भाग घेऊन कार सेवा करून आजचा सोनेरी दिवस बघण्यासाठी कर्तव्याची पराकाष्टा केली. अशा व्यक्तीच्या कर्तृत्वाची जान ठेवून या कारसेवकाचा सन्मान रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने उरुळी कांचन देवस्थान समिती, ग्रामपंचायत उरूळी कांचन यांच्या वतीने करण्यात आला.