लोणी काळभोर : नववर्षाला सुर होऊन केवळ आठ दिवस झाले असतानाच लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ॲक्सिस बँकेचे सर्व्हर बुधवारी (ता. 8) दिवसभर डाऊन झाल्याने आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत. विशेष बाब म्हणजे सकाळपासून बँकेचे सर्व्हर डाऊन असताना देखील बँकेने याबाबत खातेदारांना सायंकाळी चार वाजेपर्यंत कोणतीही कल्पना न दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे नागरिकांचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत. तर बँकेच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
लोणी स्टेशन परिसरात ॲक्सिस बँकेची एक शाखा आहे. बँक जवळ अंतरावर असल्याने आपल्याला सुविधा मिळतील. या हेतूने पंचक्रोशीतील नागरिकांनी या बँकेत बचत, चालू खाते उघडले आहेत. तर काही खाजगी कंपन्यांनी कामगारांची पगारी खाते उघडले आहेत. या खाजगी बँकेचा नागरिक बऱ्यापैकी वापर करतात. मात्र बुधवारी (ता. 8) सकाळ पासून ॲक्सिस बँकेचे सर्व्हर डाऊन होते. ही बाब बँकेच्या कर्मचाऱ्यांना माहिती असतानादेखील त्यांनी कोणत्याही ग्राहकाला याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
दरम्यान, बुधवारी १० ते १२ नागरिकांनी आरटीजीएस करण्यासाठी चेक बँकेत जमा केले होते. मात्र चार वाजले तरी आरटीजीएस न झाल्याने काही ग्राहक बँकेत गेले. तेव्हा त्यांना सकाळपासूनच बँकेचे सर्व्हर डाऊन असल्याचे समजेल. त्यावेळी काही नागरिकांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना, विचारले तुम्ही आम्हाला का सांगितले नाही. आम्ही पर्यायी मार्गाचा वापर केला असता. तेव्हा बँकेच्या कर्मचारी म्हणाले आता आम्ही फोन करून सांगतो, असे सांगितले. मात्र सर्व्हर डाऊनची बाब बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दडवील्याने नागरिकांचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत. बँकेच्या या भोंगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.