पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर झाला आहे. येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एक लाखांच्या जामीनावर त्यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलं आहे. अविनाश भोसले यांना 26 मे 2022 रोजी येस बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केली होती.
अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.
भोसले हे कोट्यवधी रूपयांचा एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली होती. अविनाश भोसले यांची अखेर 2 वर्षांनी कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.