राहुलकुमार अवचट
यवत : यवत येथील भुलेश्वर स्टील कंपनीच्या पाठीमागे झालेल्या अवैद्य मुरूम उत्खनन प्रकरणी ५ कोटी ६८ लाखांची नोटीस दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी संबंधितांना पाठवली आहे. भुलेश्वर स्टील कंपनीचे मालक विकास गोयल यांना गट नं. २५० मध्ये अंदाजे ७१८२ ब्रास अनधिकृतपणे, विना परवाना, बेकायदेशीर उत्खनन केल्याने ५ कोटी ६८ लाखाचा दंड का आकारू नये? व मुरूम चोरीचा फौजदारी गुन्हा का दाखल करू नये अशी नोटीस पाठवली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यवत येथे भुलेश्वर स्टील कंपनीच्या मागील बाजूस अनाधिकृत मुरूम उपसा केल्याचा आरोप झाल्याने भुलेश्वर स्टील कंपनी सध्या चर्चेत आहे. दौंड तालुक्यातील यवत गावचे हद्दीत भुलेश्वर स्टील या कंपनीमध्ये करोडो रुपयांचा बेकायदेशीर मुरूम उत्खनन केले असल्याची तक्रार यवत येथील श्रीजय रामदास शेंडगे यांनी दौंड तहसील कार्यलयात केली होती.
मात्र, याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने श्रीजय शेंडगे यांनी दौंड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. दरम्यान, तहसीलदार अरुण शेलार यांनी २७ जून रोजी उपोषण कर्त्यांना याबाबत १५ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत तहसीलदार अरुण शेलार यांनी तात्काळ उत्खनन झालेले क्षेत्राचा पंचनामा करत गट नं. २५० मध्ये मुरुमाचे अनधिकृत उत्खनन केले असल्याचे निदर्शनास आल्याने भुलेश्वर स्टील कंपनीचे मालक विकास गोयल यांना गट नं. २५० मध्ये अंदाजे ७१८२ ब्रास अनधिकृतपणे, विना परवाना, बेकायदेशीर उत्खनन केल्याने नोटीस पाठवली आहे.
यावेळी विकास गोयल यांनी भुलेश्वर स्टील कंपनी गट नं.२३३ मध्ये असून यामध्ये उत्खनन झाले नाही. गट नं. २५० सोबत माझा काहीही संबंध नाही असे उत्तर दिले. यानंतर तहसीलदार अरुण शेलार यांनी गट नं.२५० मधील प्रेमप्रकाश लच्छीराम गोयल व विनोद वेदप्रकाश गोयल यांना ०५ कोटी ६८ लाख ८१ हजार ५४२ रुपयांची नोटीस पाठवली.
उपोषणकर्ते तक्रारदार श्रीजय शेंडगे यांना संबंधितावर कारवाई करण्यास दिलेल्या १५ दिवसांची मुदत संपली असून अजून देखील अनधिकृत मुरूम उत्खननावर कारवाई झालेली नाही. याबाबत तक्रारदार श्रीजय शेंडगे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. तर तहसीलदार अरुण शेलार यांच्याशी संपर्क केला असता ५ दिवसांत संबंधितांना नोटीस बजावली. परंतु गट क्रमांक वेगळा असल्याने पुन्हा संबंधित दोघांना नोटीस बजावली असून याबाबत कोणताही खुलासा अद्याप प्राप्त झालेला नसल्याचे सांगितले.