उरुळी कांचन, (पुणे) : केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सी.आर.पी.एफ) जवान कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील सुपुत्र काळूराम भाऊसाहेब कड यांना 1992 साली झालेल्या आतंकवादी हल्ल्यात वीरमरण आले होते. सरकार निर्णयानुसार दरवर्षी 9 ऑगस्टला शहीद वीर जवान काळूराम कड यांचा शहीद दिन कोरेगाव मूळ येथे साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान उपनिरीक्षक गुलाब पवार यांनी दिली.
कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अमर एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी शहीद वीर जवान काळूराम कड यांचा शहीद दिन साजरा केला. यावेळी बोलताना जवान उपनिरीक्षक गुलाब पवार यांनी ही माहिती दिली.
यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे शिपाई श्रीनिवास एम, संतोष मावरकर, त्यांचे बंधू बाळासाहेब कड, वहिनी ताराबाई कड, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे, कोरेगाव मूळचे आजी – माजी सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, गावचे पोलीस पाटील, संचालक, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे बोलताना पवार म्हणाले, “पंजाब येथील गोविंदपुरा गावामध्ये 9 ऑगस्ट 1992 रोजी आतंकवादी लपून बसले होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी त्या दिशेने रवाना झाली होती. यामध्ये काळूराम कड हे सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी सीआरपीएफचे जवान व आतंकवादी यांच्यामध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत काळूराम कड यांना दुखापत झाली. दुखापत झाली असताना देखील त्यांनी एका आतंकवाद्याला ठार केले.”
दरम्यान, काळूराम कड त्यांना उपचारादरम्यान वीरमरण आले. कड यांनी शौर्य दाखवले त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. सरकार निर्णयानुसार यापुढे दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी शहीद वीर जवान काळूराम कड यांचा शहीद दिन कोरेगाव मूळ येथे साजरा करण्यात येणार आहे.