हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हांडेवाडी (ता. हवेली) परिसरात असलेले एसबीआय या बँकेचे एटीएम लोखंडी टिकावाच्या सहाय्याने फोडून रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (ता. २६) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
विक्रमलाल इंद्रलाल शहा (वय २८, रा. हॉटेल ग्रीन हिल्स, उरुळी देवाची पुणे (मुळ रा. भटगाव, तेहरी गर्हाल, उत्तराखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार वैभव भोसले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हांडेवाडी परिसरातील हांडे शॉपिंग सेंटर या ठिकाणी एसबीआय या बँकेचे एटीएम आहे. सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास विक्रमलाल इंद्रलाल शहा हा लोखंडी टिकावाच्या सहाय्याने एटीएम मशीन मधून पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने एटीएम मशीनचा पत्रा उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, या प्रकरणी आरोपी विक्रमलाल शहा याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करीत आहेत.