पुणे : पुण्यामध्ये गणेशोत्सवाची आज सांगता होणार असून आज अनंत चतुर्दशी दिवशी (मंगळवारी १७ सप्टेंबर) मोठ्या तयारीसह भावुक अंतकरणाने भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. आज मोठ्या थाटामाठात विसर्जन मिरवणुक पार पडणार आहेत. त्यासाठी पोलिस प्रशासन, वैद्यकीय सुविधा, यांनी देखील जय्यत तयारी केली आहे.
शहर परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दरवर्षीच्या प्रथेनुसार महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साडेदहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
आज लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पहिले पाच गणपती आणि त्यानंतर इतर गणेश मंडळे लक्ष्मी रोडसह केळकर, कुमठेकर, टिळक आणि कर्वे रस्ता अशा मिरवणूक मार्गांवरून विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची मिरवणूक दुपारी चार वाजता सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. मिरवणुकीसाठी साडेसहा हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी मार्शलची पथके सुद्धा हजर असणार आहे.
१२ ठिकाणी पोलिसांची मदत केंद्रे..
विसर्जन मार्गावर गणेशभक्तांच्या सोयीसाठी १२ ठिकाणी पोलिसांनी मदत केंद्रे उभारण्यात आली असल्याची माहिती आहे. तर, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ३९ वॉच टॉवर मिरवणुकीवर नजर ठेवून असणार आहेत. गणेश विसर्जनासाठी महापालिकेचीही यंत्रणा सज्ज झाली आहे. विसर्जन घाटांवर जीवरक्षक तैनात असून, वैद्यकीय पथक सुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहे. यंदाची मिरवणूक ही लवकरात लवकर संपवण्याचे पोलिसांचे नियोजन असणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मिरवणुकीसाठी सुंदर रथ सज्ज..
शिवाजी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीसाठी अनेक सुंदर रथ तयार करण्यात आले आहते. पुण्यात वेगवेगळ्या मंडळाकडून सुंदर देखावे तयार केले जात असतात, जे मुख्य आकर्षण ठरत असतात. सुंदर फुलांनी सजलेले हे रथ पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत असते. हे सर्व रथ आता सज्ज आहेत. पुण्यातील लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौकात बाप्पाल निरोप देण्यासाठी रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत.