उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील ग्रामपंचायत सदस्या प्रियंका ओमकार कांचन व सुजाता चंद्रकांत खलसे यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून तळवाडी व एलाईट चौकात सेवा देणाऱ्या पोलीस बांधवांना अनोख्या पद्धतीने रस्त्यावर थांबूनच रक्षाबंधन सण साजरा केला.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संसार, कुटुंबाची पर्वा न करता तसेच सणासुदीच्या आनंदावर विरजण टाकून कर्तव्य बजावून कशाचीही पर्वा न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना राखी बांधण्यात आली.
पोलीस सुद्धा एक कोणाचातरी भाऊ आहे आणि त्यांना आपल्या सेवेमुळे आपल्या बहिणींकडे जाता येत नाही. त्यामुळे उरुळी कांचन ग्रामपंचायत सदस्या प्रियंका कांचन व सुजाता खलसे यांनी उरुळी कांचन चौकामध्ये आणि आश्रम रोड चौकामध्ये सेवा देणाऱ्या पोलीस बांधवांना अनोख्या पद्धतीने रस्त्यावर थांबूनच राखी बांधली. दरम्यान, यावेळी पोलीस हवालदार रमेश भोसले, विशाल मोरे, गायकवाड, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन, आदी मान्यवर उपस्थित होते.