पुणे : विद्येचे माहेरघर अशी पुण्याची ओळख आहे. ही ओळख पुणेकर आजवर जपत नव्हे तर वृद्धींगत करत आहेत. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी गुरुवारी ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला शहरातील चौकांत, रिक्षाथांब्यांवर, सरकारी-खासगी कार्यालयांमध्ये, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल दोन लाख पुणेकरांनी या उपक्रमात सहभाग घेत, वाचनासोबतच एकाच वेळी तीन हजार ६६ पालकांनी आपल्या मुलांना गोष्टी सांगितल्या. या कामगिरीमुळे आपल्या पाल्यांना गोष्टी सांगण्याचा चीनच्या नावावर असलेला विक्रम गुरुवारी भारताच्या नावावर झाला. चीनचा विक्रम पुणेकरांनी मोडून काढला. पुणे महापालिकेच्या पुढाकराने आयोजित केलेल्या या उपक्रमाची नोंद विश्वविक्रम म्हणून होताच ढोल-ताशांचा गजर आणि देशभक्तीपर गीत गायन करून एकच जल्लोष करण्यात आला. पुण्यात नोंदवल्या गेलेल्या विश्वविक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. वाचनाचा आनंद पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
पुणे महापालिका आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर या काळात पुणे पुस्तक महोत्सव सुरु आहे. या महोत्सवाअंतर्गत ‘बालक-पालक’ हा गोष्ट सांगण्याचा सामूहिक कार्यक्रम गुरुवारी राबविण्यात आला. यामध्ये एकाच वेळेस आपल्या मुलांना गोष्ट सांगण्याचा विश्वविक्रम करण्यात आला. ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’ या अभिनव अभियानानुसार तीन हजार ६६ पालकांनी मुलांना गोष्टी सांगितल्या.
दरम्यान, २०१५ मध्ये चीनमध्ये २ हजार ४७९ मुलांना पालकांनी गोष्टी सांगण्याचा विक्रम नोंदवला. मुख्य म्हणजे क्षिपा शहाणे यांनी लिहिलेल्या ‘निसर्गाचा नाश करु नका’ या पुस्तकातील गोष्ट सांगण्यात आली, त्यावेळी गिनिज बुक ऑफ रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर झाल्याचे जाहीर केले. विक्रम आपल्या नावावर झाल्याचे कळताच मैदानात ‘वंदे मातरम्, भारत माता की जय’ अशा घोषणा देत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.
मान्यवरांची आवर्जुन उपस्थिती
नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजातून वेळ काढत विधानसभेचे सभापती अॅड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले होते. अनेकांनी सोशल मीडियावर पुस्तक वाचतानाचे फोटो शेअर करीत पाठिंबा जाहीर केला.
वाचन संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध देशपांडे, सिम्बायोसिस कुलपती डॉ.एस.बी.मुजुमदार, ‘बार्टी’चे महासंचालक डॉ. सुनील वारे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन कोठावळे, ‘सरहद’चे संजय नहार, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. शिवाजीराव कदम, साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, अभिनेता प्रवीण तरडे, डॉ. मिलिंद जोशी, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी उपक्रमात सहभागी होत वाचन संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन केले.