उरुळी कांचन (पुणे) : जुन्या भांडणाच्या कारणावरून शिंदवणे येथील एका तरुणावर धारधार लोखंडी कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बस स्टॉपजवळ सोमवारी (ता. 01) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुष गणेष शेलार (रा. तेल्याचा मळा, रा. शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे) असे मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर आदेश जनार्दन कामठे, (वय-21, धंदा-शेती, रा. खंडोबाचा माळ, शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कामठे याने दिलेल्या तक्रारीनुसार आयुष शेलार याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 01) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आदेश कामठे हे त्यांच्या दुचाकीवरून घरी निघाले होते. त्यावेळी त्याच बाजूने आयुष शेलार हा त्याच्या दुचाकीवरून घरी निघाला होता. शिंदवणे गावच्या हद्दीत बस स्टॉपजवळ दोघही आले असता आयुष शेलार याने पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून पिशवीतील लोखंडी कोयता काढुन आदेश कामठे याला जीवे मारण्याची धमकी देत लोखंडी कोयत्याने डाव्या हातावर वार केला.
यावेळी परिसरात असलेले लोक जमा झाल्याने आयुष शेलार हा त्या ठिकाणावरून पळून गेला. याप्रकरणी कामठे याने दिलेल्या तक्रारीनुसार शेलार याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगताप करीत आहेत.