पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अशातच आता दिघी येथे धक्कादायक घटना घडली आहे. बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलिंडर डोक्यात घालून सहकारी मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी घडली आहे.
संतोष शंकर खंदारे (वय 45, रा. दिघी रोड, मुळ – वाशिम) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. गणेश दिगंबर खंडारे (रा. दिघी, मुळ – वाशिम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष खंदारे हे तीन महिन्यापूर्वी कामानिमित्त मूळ गावावरून दिघी येथे कामानिमित्त राहण्यास आले होते. संतोष खंदारे आणि गणेश खंडारे दोघेही बांधकाम साईटवर मिस्त्रीचे काम करत होते. रविवारी (दि. 15) आठवड्याची सुट्टी असल्याने दोघेही घरी होते. त्यामुळे त्यांनी बिर्याणी बनवण्याचा बेत आखला होता. त्यादरम्यान आरोपी गणेश याने बिर्याणी बनवली. मात्र ती बिर्याणी चवीला चांगली झाली नाही, असे म्हणत खंदारे यांनी खंडारे याच्याशी वाद घातला.
त्या कारणावरून दोघांच्यात प्रचंड हाणामारी झाली. यावेळी गणेश खंडारे याने रागाच्या भरात संतोष खंदारे यांच्या डोक्यात गॅस सिलिंडर घातला. यामध्ये खंदारे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.