पुणे : हडपसर परिसरातील हांडेवाडी रोडवर रात्रीच्या वेळी थांबलेल्या तृतीयपंथींना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. सचिन बनसोडे (वय-३४), महेश बनसोडे (वय-२३) आणि आदित्य गायकवाड (वय-२०, तिघे रा. पाण्याच्या टाकीजवळ, देवाची उरुळी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत गंगानगरमध्ये राहणार्या एका २४ वर्षाच्या तृतीयपंथीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मंतरवाडी कात्रज रोडवरील हांडेवाडी येथील ग्रीन हॉटेलसमोर २२ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे साथीदार ग्रीन हिल हॉटेलबाहेर रोडवर थांबले होते. त्यावेळी सचिन बनसोडे, महेश बनसोडे, आदित्य गायकवाड व एक जण त्या ठिकाणी आले. फिर्यादी यांनी येथे का आले असे विचारले. तेव्हा त्यांनी फिर्यादीशी वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी या त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी फिर्यादीच्या साथीदारांना हाताने मारहाण केली.
तसेच सचिनने प्लायवूडचा तुकडा उचलून फिर्यादीच्या तोंडावर, पाठीवर मारुन जखमी केले. एवढेच नाही तर आदित्यने फिर्यादीच्या एका साथीदाराला कमरेचा बेल्ट काढून मारहाण केली. फिर्यादीच्या तोंडातून रक्त आलेले पाहून चौघेही पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.