पुणे : खून प्रकरणाच्या तपासात पोलिसांना मदत केली म्हणून हॉटेलमध्ये येऊन तोडफोड करत, वार करुन परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि हॉटेल चालकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या कुख्यात गुंड तिरुपती ऊर्फ टक्या लष्कर व त्याच्या तीन साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. दोन वर्षांपूर्वी पापडे वस्ती येथे हा खून झाला होता. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत १०५ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे.
याप्रकरणी टोळी प्रमुख तिरुपती उर्फ टक्या विठ्ठल लष्कर (वय-२१, रा. पापड वस्ती, पुणे), शुभम सुरेश करांडे (वय-२२, रा. हडपसर, पुणे), अथर्व रविंद्र शिंदे (वय-२१, रा. साडेसतरा नळी, हडपसर) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन शुभम करांडे याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ डिसेंबर रोजी फिर्यादी हे त्यांच्या कानिफनाथ अमृततुल्य हॉटेलमध्ये (पीएमटी बस डेपो शेजारी, ढमाळवाडी, भेकराईनगर) असताना तिरुपती ऊर्फ टक्या लष्कर (रा. पापडेवस्ती) व शुभम करांडे (रा. पापडेवस्ती) यांनी २०२१ मध्ये पापडे वस्ती येथे मर्डर केल्याने त्यावेळी फिर्यादींनी पोलिसांना मदत केल्याचे समजून त्यांच्या हॉटेलमध्ये येऊन त्यांच्या हॉटेलमधील खुर्च्या, टेबल फेकून, हॉटेलमधील काउंटरची काच फोडली. तसेच हातातील लोखंडी धारदार शस्त्र हवेत फिरवून फिर्यादीच्या अंगावर धावून वार केला. तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मी आताच मर्डरमधून बाहेर आलोय, जो कोणी माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करेल त्याचा मी गेम करेन, अशी धमकी दिली होती. यावरून हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला होता.
हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी परिमंडळ- ५ चे पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्यामार्फत अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अप्पर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.