उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विनी चिंतामणी कड यांची गुरुवारी (ता. २१) बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच मंगल जगन्नाथ पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच मंगेश कानकाटे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत अश्विनी कड यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश कानकाटे यांनी अश्विनी कड यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली. ग्रामविकास आधिकारी सतीश कालेकर यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले. यावेळी माजी उपसरपंच लीलावती बोधे, वैशाली अमित सावंत, सदस्य बापूसो यशवंत बोधे, भानुदास जेधे, राधिका संतोष काकडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच अश्विनी कड निवडीनंतर म्हणल्या, “गावच्या सर्वांगीण विकास कामासाठी सरपंच – ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्व जण प्रयत्न करु. तसेच येणाऱ्या भविष्यकाळात मला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून विकासकामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करावे”, अशी अपेक्षा कड यांनी व्यक्त केली.