उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील गावात लावण्यात आलेले आमदार अशोक पवार यांचे बॅनर हटविण्यात आले आहेत. त्याठिकाणी शरद पवारांचे बॅनर लावण्यात आले आहेत. या प्रकारामुळे पूर्व हवेलीत विविध चर्चांना उधाण आले असून उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
शिरूर -हवेली विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमाळी चुरशीच्या टप्प्यात आली असून दोन्ही उमेदवारांनी गाव भेट दौरा करत शक्तीप्रदर्शनावर भर दिला आहे. अशोक पवार दोन टर्म आमदार असल्याने व त्यांची अभ्यासू आमदार अशी ओळख असल्याने त्यांच्याकडे प्रचाराची मोठी यंत्रणा कार्यन्वित आहे. त्यांच्याकडे असलेला अनुभव व तळागाळातील संपर्क याच्या जोरावर त्यांनी प्रचाराची रणधुमाळी गावोगावी सुरु आहे.
अशोक पवार यांच्या तुलनेने ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके हे नवखे उमेदवार आहेत. मात्र त्यांच्याकडे तरुणाईचा उस्फुर्त प्रतिसाद पाहता त्यांच्या गाव भेट दौऱ्याला पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, नायगाव -पेठ, उरुळी कांचन व परिसरातील प्रतिसाद पाहता निवडणूक विशिष्ठ वळणावर लोकांनी नेली आहे.
सोशल मिडीयावर माऊली आबा कटके व त्यांच्या टीमने आघाडी घेतली आहे. सोशल मीडियावर माऊली पर्व या नावाने हवेली व शिरूरच्या भागात वादळ घोंगावत आहे. त्या तुलनेत अशोक पवार यांची सोशल मीडियाची टीम कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावरचा प्रतिसाद पाहता शिरूर – हवेलीमध्ये माऊलीचा गजर मोठ्या प्रमाणात वाजत आहे. याची धास्ती विरोधकांनी घेतली आहे.
दरम्यान, त्यातच आमदार पुत्राचे अपहरण, खंडणी, मारहाण या बाबत गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून राजकीय चिखलफेक सुरु आहे. त्यामुळे शिरूर हवेलीचा कल राजकीय जाणकारांच्या मते निर्णायक वळणावर झुकलेला असताना मोठी रंगत निर्माण झाली आहे. त्यामुळे अनुभूवी, अभ्यासू व कसलेल्या पैलवानाप्रमाणे कार्यरत असलेल्या अशोक पवारांनी राजकीय डावपेच साधत नवीन खेळी केल्याची चर्चा सुरु झाली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशोक पवार यांनी स्वतःचे फ्लेक्स हटवून निष्ठा व शरद पवारांचा फोटो असलेले फ्लेक्स मतदारसंघात लावण्यात येत आहे. यामुळे परिसरात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.