Ashadhi Vari पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्वराज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी नतमस्तक झाले आहेत. (Ashadhi Vari) यावेळी गणपती बाप्पा मोरया… माऊली माऊली च्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. (Ashadhi Vari)
बेळगाव (कर्नाटक)मधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या हिरा-मोती या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करीत निर्मल वारी – हरित वारी करिता श्री गणेश आणि माऊली चरणी प्रार्थना केली. तसेच मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
महादजी राजे शितोळे सरकार म्हणाले, गणपती बाप्पाच्या दर्शनाने ऊर्जा मिळते. त्या ऊर्जेने वारीमध्ये पुढे चालत जात असतो. बाप्पाचे असेच आशिर्वाद कायम वारक-यांवर असावे. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिरा बाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. मात्र, आता अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली असून ही शुभ गोष्ट आहे. आता श्रीगणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आळंदीकडे प्रस्थान करतील. ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात. असेही शितोळे सरकार यांनी सांगितले आहे.