पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला मंगळवारी उपचारासाठी पुण्यात आणण्यात आले आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने गेल्या १३ ऑगस्ट रोजी आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिल्यानंतर त्याला पुण्यात आणल्याचे सूत्रांनी सांगितले. सप्टेंबर २०१३ मध्ये अटक करण्यात आलेल्या ८३ वर्षीय आसाराम बापूवर पुढील सात दिवस पुण्यातील माधवबाग रुग्णालयात हृदयाशी संबंधित काही आजारांवर उपचार केले जातील.
यावेळी त्याच्यासोबत चार पोलीस व दोन अटेंडंट असणार आहेत. पुण्यातील उपचाराचा सर्व खर्च स्वतः आसाराम बापूला करावा लागणार आहे, असे राजस्थान पोलिसांनी म्हटले आहे. प्रकृती बरी नसल्याचे कारण सांगत आपली शिक्षा स्थगित करण्याची आसाराम बापूची याचिका उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी अनेकदा फेटाळली आहे. पण, त्याला आयुर्वेदिक उपचार घेण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.