लोणी काळभोर, (पुणे) : टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा, तुकोबां’चे स्मरण करत पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांचा भक्तिसागर बुधवारी (ता. 03) ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी पालखी सोहळा लोणी काळभोर, व कदमवाकवस्ती येथे दाखल होणार आहे. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, महसूल विभाग, महावितरण व पोलिस प्रशासन अशा सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. पालखी सोबत असणाऱ्या भाविकांना आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आपापल्या परीने यंत्रणा सुसज्ज झाली आहे.
पुणे शहरातील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून मंगळवारी जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर प्रथमच मुक्कामी येणार आहे. यावर्षी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पालखी तळ सर्व सोईसुविधांनी परिपूर्ण झाल्याने यावेळी प्रथमच पालखी सोहळा याठिकाणी मुक्कामी येणार असल्याने तळानजीक असलेल्या ओढ्याचे खोलीकरण करण्यात आले असून पुलावर संरक्षक जाळी बसविण्यात आली आहे. सर्व ग्रामस्थ स्वागतासाठी सज्ज असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे व उपसरपंच नासिरखान पठाण यांनी दिली.
निर्मलवारी अंतर्गत ठिकठिकाणी मोबाईल शौचालयांची सोय करण्यात आली आहे. तेथे लाइट व पाण्याचीही सोय करण्यात आली आहे. पालखी मार्गावरील बांधकामाचा राडारोडा, खडी, वाळू, माती व साईडपट्टया साफ करून घेण्यात आल्या आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून औषध व धूरफवारणीही केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अंतर्गत पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिकमुक्त, प्रदूषणमुक्त तसेच पर्यावरण हरित संतुलनासाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत 590 तर लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत 535 शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वारक-यांना पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यासाठी परिसरातील विहिरींमध्ये टीसीएल टाकून पाणी शुद्ध करण्यात आले आहे. डासांच्या निर्मूलनासाठी फोन्गिंग मशीनच्या माध्यमातून धूर फवारणी करण्यात येत आहे. पालखी सोहळ्यांतील वारक-यांना पिण्यासाठी आर. ओ. प्लॅन्टचे फिल्टर पाणी मोफत पुरविण्यात येणार आहे. विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या प्लॅन्ट मधून वारक-यांना पिण्यासाठी पाणी पुरवण्यात येणार आहे.
लोणी काळभोरचे ग्रामविकास अधिकारी सतिश गवारी व सरपंच सविता लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार पालखी यावर्षापासून जरी कदमवाकवस्ती हद्दीतील पालखी तळावर मुक्कामी असली तरी वारक-यांच्या सोयीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी तळ, आठवडा बाजार मैदान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, गावठाण परिसर, गावातील प्रमुख रस्ते, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे मैदान, कन्या प्रशाला, मराठी शाळेचे मैदान व गावातील सर्व मंदिरे स्वच्छ करण्यात आली आहेत.
“कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे म्हणाले, पुणे-सोलापूर महामार्गालगत कचरा कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. तसेच आरोग्यविषयक स्टॉल लावण्यात येणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहाची व्यवस्था ग्रामपंचायतीने पालखीतळावर करण्यात आली आहे.”
आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डी. जे जाधव व रुपाली बंगाळे म्हणाले, “घरगुती व सार्वजनिक पाणीसाठ्याची तपासणी करून सर्वेक्षण करण्यात आले. डासांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी धुरळणी करण्यात आली आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, विठ्ठल मंदिर या ठिकाणी वारकऱ्यांवर मोफत उपचारासाठी तात्पुरती मदत केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने एक कर्मचारी दोन शीपमध्ये नेमण्यात आला आहे. माहितीसाठी फलक लावण्यात आले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी 1, आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी 3, आरोग्य सहाय्यक 1, आरोग्य सहाय्यीका 1, आरोग्य सेवक 05, आरोग्य सेविका 07, शिकाऊ डॉक्टर, 06, समुदाय आरोग्य अधिकारी 04, आशा स्वयंसेविका व इतर कर्मचारी 58, तसेच 5 बाह्यरुग्ण कक्ष, आरोग्यसेविका पथकाच्या माध्यमातून वारकऱ्यांना उच्च दर्जाची तातडीची आंतररूग्ण व बाह्यरूग्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. 5 रुग्णवाहिकांचे नियोजन करण्यात आले आहे. आयसीयू डॉक्टर 2, व स्टाफनर – 2, 108 रुग्णवाहिका व डॉक्टर देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक दिंडीप्रमुखास औषधोपचार किट देण्यात येणार आहे.