लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कवडीपाट ते टोलनाका या दरम्यान अपघातांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचे नाहक बळी जात आहेत. मागील ११ महिन्यांच्या कलावधीत झालेल्या अपघातांमध्ये ६० जणांनी आपला जीव गमावला आहे, तर सुमारे ६१ जण गंभीर जखमी झाले आहेत. भीषण अपघातांमध्ये काहींना आपले अवयवदेखील गमवावे लागले आहेत. नागरिकांचा प्रवास सुलभ आणि सुखकर व्हावा, प्रवासाचा वेळ वाचावा, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून राज्यात महामार्गांचे जाळे विकसित करण्यात आले आहे. मात्र, हेच महामार्ग अल्पावधीतच मृत्यूचे सापळे म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. यानिमित्ताने अपघातांचे प्रमाण का वाढते आहे, अजाणतेपणी होणाऱ्या या मृत्यूंना जबाबदार कोण? याची चिकित्सा करण्याची मागणी संतप्त नागरिक करत आहेत.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट-टोलनाका ते यवत (ता. दौंड) दरम्यानच्या ३४ किलोमीटरच्या अंतरात सर्वाधिक अपघात होत आहेत. दैनंदिन प्रवासी वाहनांमुळे महामार्गावरील वाहतूक सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महामार्गावरून प्रवास करताना योग्य ती काळजी न घेतल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन, लोणी काळभोर कॉर्नर, थेऊर फाटा, कुंजीरवाडी येथील गावांत जाणारा रस्ता, आळंदी म्हातोबाची, नायगाव व सोरतापवडी या ठिकाणच्या चौकात वाहनांची गर्दी नेहमीच असते. तसेच उरुळी कांचन येथील ऍलाईट चौकात आणि तळवडी चौकातून जेजुरीकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. दरम्यान, महामार्गावरील कवडीपाट टोलनाका ते यवत या भागातील रस्त्याचे काम आयआरबी (आयडियल रोड बिल्डर) या कंपनीने केले आहे. साधारणपमे १४ वर्षे या रस्त्याची टोलवसुली या कंपनीने केली आहे. मात्र, टोल बंद झाल्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर महामार्गावरील सुविधा होतील अशी अपेक्षा येथील नागरिकांना होती.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
* अपघाताची कारणे
महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाढलेली हॉटेल्स, विविध ढाबे, लोकांनी सोयीसाठी अनधिकृतपणे फोडलेले रस्ता दुभाजक, हॉटेलच्या ठिकाणी रस्त्यावर घातलेले गतिरोधक, सेवा रस्त्यावर केलेले अतिक्रमण, महामार्गावर चारचाकी गाड्या थांबवणे, लेनची शिस्त न पाळणे आणि रस्त्यावर हॉटेल असल्यास गाडी थांबवून, मद्य पिऊन गाडी चालविणे.
* महामार्गाची दुरवस्था
१) पुणे-सोलापूर महामार्गाच्या कडेच्या जाळ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत.
२) रस्त्याच्या कडेला झाडे उगवली आहेत.
३) रस्त्याच्या दुतर्फा मातीचे मोठमोठे ढीग साचले आहेत.
४) महामार्गावरून जाणाऱ्या वाळूच्या ट्रकमधून पडणारी वाळू.
५) ठिकठिकाणी तुटलेले लाईट कटिंग बॅरिअर्स
* अपघाताची आकडेवारी खालीलप्रमाणे
– १ जानेवारी २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत अपघातांचे तब्बल ११७ गुन्हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. या अपघातात ६० जणांना मृत्यू, तर ६१ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर महामार्गावर किरकोळ असे शेकडो अपघात झालेले आहे. हे अपघात आपापसांत मिटले आहेत.
प्रशासनाने कडक कारवाई करावी
पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करताना अनेक वाहनचालक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवीत आहेत. काही वाहनचालक रस्त्यावर गाडी पार्क करतात. तर काही व्यावसायिकांनी सेवा रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून गाडी चालविताना भीती वाटते. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी.
– ओम गंगणे (नागरिक, लोणी काळभोर)
उपाययोजना सुरू आहेत…
पुणे-सोलापूर महामार्गावर पुणे शहरात दिवसा अवजड मालवाहतुकीस बंदी आहे. त्यामुळे मालवाहतूक संध्याकाळी होत असल्याने अपघातांचे प्रमाण संध्याकाळी जास्त आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. लोणी स्टेशन चौकातील सिग्नल चालू करून घेतला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक नियमांचे सूचना फलक लावले आहेत. महामार्गावरील रस्ता दुभाजकाची उंची वाढविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच बेकायदेशीररित्या चालविणारे वाहनचालक व नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात आपोआप घट होईल व मृत्युचे प्रमाणही कमी होईल.
– सचिन शिंदे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, लोणी काळभोर)