शिक्रापूर : विधानसभा निवडणुकीमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शस्त्र परवानाधारकांकडून शिक्रापूर पोलिस ठाणे हद्दीतील ११६ शस्त्रे जमा करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार आचारसंहिता सुरू असताना निवडणूक कालावधीमध्ये शस्त्रांचा गैरवापर होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शस्त्र परवानाधारकांना शस्त्रे जमा करणे आवश्यक आहे. याबाबत शस्त्रधारकांना शस्त्रे जमा करण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले होते.
शिक्रापूर ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये एकूण ११९ शस्त्र परवानाधारक असून यापैकी ११६ शस्त्रे शिक्रापूर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. १ शस्त्रपरवानाधारक हे बँकेमध्ये रक्कम सुरक्षिततेसाठी तर दोन परवानाधारक मंदिर ट्रस्ट सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक असल्यामुळे तीन शस्त्र परवानाधारकांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूट दिली आहे. ११९ पैकी ११६ परवानाधारकांचे शस्त्र जमा झाले असल्याची माहिती पोलिस हवालदार नवनाथ नाईकडे, पोलिस नाईक अपेक्षा टाव्हरे यांनी दिली