न्हावरे: इनामगाव (ता.शिरूर) येथे जुन्या वादातून एका कुटुंबावर आज (दि.07) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दहा जणांच्या टोळक्याने कोयते, लोखंडी रॉड, हॉकीस्टिक व लाकडी दांडक्यांनी सशस्त्र हल्ला केला. या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले असून, शिरूर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि एकाच कुटुंबाला विविध शस्त्राने मारहाण केल्यामुळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे संबंधित आरोपींच्याविरोधात दाखल केले आहेत.
मनिषा अंकुश काळे (रा.मांडवगण फराटा, ता.शिरूर, जि.पुणे), दिनेश अंकुश काळे, अक्षय अंकुश काळे, हरीदास संपत भोसले, लैलाबाई हरीदास भोसले, लल्या हरीदास भोसले, कबई अंकुश काळे (सर्व जण रा.गणेगाव दुमाला, ता.शिरूर, जि.पुणे), चिंटू काळे (रा.दौंड टोल नाक्याजवळ, ता.दौंड, जि.पुणे)
प्रदीप (पूर्ण नाव माहित नाही, रा.श्रीगोंदा,ता.श्रीगोंदा,जि.अ.नगर), लाली नवनाथ चव्हाण (रा.मांडवगण फराटा-गारमाळ, ता.शिरूर,जि.पुणे) या दहा आरोपींच्या विरोधात शिरूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
रूपाली आतिश चव्हाण (वय 20,रा. इनामगाव, ता.शिरूर, जि.पुणे) या महिलेने आरोपींच्या विरोधात शिरूर पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी दिनेश अंकुश काळे याने मंगळवारी (ता.06) रात्री फिर्यादी महिलेची छेड काढली होती. त्यावेळी फिर्यादी महिला व दिनेश यांच्यामध्ये वाद झाला होता. त्या रागातून आरोपींनी बुधवारी (ता.07) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर फिर्यादीच्या झोपलेल्या कुटुंबावर कोयते, लोखंडी रॉड, हॉकीस्टिक, लाकडी दांडके, दगड आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. हल्ला इतका तीव्र होता की, त्यामध्ये पवन भुजाबा चव्हाण, शिन्नर भुजाबा चव्हाण, सुजी शिन्नर चव्हाण, बापू काळे, धनराज काळे, चिप्पट भुजाबा चव्हाण आणि शुभम पवन चव्हाण हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.
या प्रकरणी मारहाणीसाठी बेकायदा विविध प्रकारची हत्यारे वापरल्यामुळे आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आज रात्री (ता.07) उशिरा मनिषा अंकुश काळे, हरिदास संपत भोसले या दोन आरोपींना मांडवगण फराटा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
या घटनेमुळे इनामगाव गावामध्ये तणावाचे वातावरण असून, मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवगण फराटा पोलीस करत आहेत.