लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर ते रामदरा या दरम्यानच्या रस्त्यासह हवेलीतील पाच रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते मंजूर झाल्याची माहिती पुणे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक प्रदीप कंद व भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली.
हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ते रामदरा रोड, कोलवडी ते साष्टे रस्ता, कोलवडी ते शितोळे वस्ती रस्ता, लोणीकंद ते डोंगरगाव रस्ता, डोंगरगाव ते वारघडे वस्ती बकोरी रस्ता, अशी मंजूर झालेल्या रस्त्यांची नावे असून दरम्यान हे काम लवकरच सुरु असल्याचे भोंडवे यांनी जाहीर केले.
मागील काही दिवसापांसून सदर वरील रस्ते खराब झाले होते. याबाबत वारंवार नागरिकांनी रस्त्यासाठी मागणी केली होती. अखेर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत रस्ते मंजूर झाल्यामुळे पूर्व हवेलीतील या रस्त्यांचे काम मार्गी लागले आहे.
पुणे – सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याशी महामार्गावरुन सात किलोमीटर अंतरावर तीर्थक्षेत्र रामदरा वसले आहे. सदर मंदिराकडे जाणारा रस्ता थोडा अरुंद असून या रस्त्यावर बरेच खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.
शेतीला पाणी पुरवठा करणा-या नवा मुठा उजवा कालवा ओंलाडून जावे लागते. तसेच मुठा कालव्या वरील पूल १९६५ साली बांधला आहे. ५७ वर्षं वयाचा हा पूल कुमकुवत झाला आहे. या पुलाचे बांधकाम ढासळले आहे. हा पूल कधीही पडू शकतो. तीर्थक्षेत्र रामदरा येथे जाणा-या पाच हजार भाविकांना याच पूलावरून जावे लागते. याबाबत वारंवार या रस्त्याची मागणी करण्यात येत होती.