पुणे : पुणे शहराचा वाढता विस्तार, गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेता गृह विभागाने शहरात नवीन सात पोलीस ठाण्याला अंतिम प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यासाठी ५९ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे. तसेच नवीन ८१६ पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना देखील मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर सात नवीन पोलीस ठाण्यांचा श्रीगणेशा होणार आहे.
आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, वाघोली, फुरसुंगी आणि काळेपडळ ही नवीन सात पोलिस ठाणी सुरू होणार आहेत. पोलिस आयुक्तालयातील भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, चतुः श्रृंगी, लोणी काळभोर, लोणीकंद, हडपसर, वानवडी आणि कोंढवा या पोलिस ठाण्यांचे विभाजन करून तर पुणे ग्रामीणमधील हवेली या पोलिस ठाण्याचा काही भाग समाविष्ट करून या नवीन सात पोलिस ठाण्यांची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून आठवडाभरात या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती आहे.
दरम्यान, शहराचा वाढता विस्तार पाहता उपनगरांशी जोडलेली लोणीकंद आणि लोणी काळभोर ही पुणे ग्रामीण परिक्षेत्रातील दोन पोलिस ठाणी पुणे शहर आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या कार्यकाळात देखील या पोलिस ठाण्यांबाबत शासनाकडे पाठपुरवा केला, मात्र, मुहूर्त काही मिळाला नाही. यानंतर अखेर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सतत पाठपुरावा करून या पोलिस ठाण्यांना अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळवून, नवीन मनुष्यबळाची तरतूद देखील करून घेतली आहे.
नवीन पोलिस ठाण्यासाठी निधीची तरतूद
खराडी पोलीस ठाणे : ७ कोटी ५० लाख
फुरसुंगी पोलीस ठाणे : ८ कोटी ८१ लाख
नांदेड सिटी पोलीस ठाणे : ८ कोटी ६० लाख
वाघोली ठाणे : ८ कोटी ७५ लाख
बाणेर पोलीस ठाणे : ८ कोटी ६० लाख
आंबेगाव पोलीस ठाणे: ७ कोटी ९ लाख
काळेपडळ पोलीस ठाणे : १० कोटी २४ लाख
मंजूर करण्यात आलेले मनुष्यबळ
खराडी – १०३
फुरसुंगी – १२२
नांदेड सिटी – ११८
वाघोली – १०८
बाणेर – ११०
आंबेगाव – ९८
काळेपडळ – १४०