पुणे :अखिल भारतीय मराठा महासंघाच्या संयुक्त सरचिटणीस पदी पुणे येथील गुलाब नामदेवराव गायकवाड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
पंढरपूर येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सर्वानुमते गायकवाड यांची संयुक्त सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आले. या नियुक्तीचे पत्र मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते गुलाब गायकवाड यांना देण्यात आले आहे.
यावेळी मराठा महासंघाचे सरचिटणीस प्रकाश देशमुख, खजिनदार प्रमोद जाधव, उपाध्यक्ष वसंत मुळीक, विनायकराव पवार, राष्ट्रीय महिला अध्यक्ष एडवोकेट भारती पाटील, युवक अध्यक्ष आतिश गायकवाड, पंढरपूर जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष कार्यकारणी सदस्य मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुलाब गायकवाड हे गेल्या पंचवीस वर्षांपासून अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये कार्यरत आहेत. शाखाध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष असा त्यांचा मराठा महासंघामधील प्रवास आहे. मराठा महासंघाचे ते जिल्हा सरचिटणीस दहा वर्ष, पुणे जिल्हाध्यक्ष, पुणे शहराध्यक्ष अशा विविध पदांवरती त्यांनी कामे केली आहेत. तसेच ते मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा समन्वयक आहेत.
दरम्यान, मराठा महासंघामध्ये गायकवाड यांनी मराठा तरुणांच्या आरक्षणासंदर्भामध्ये आंदोलने, रास्ता रोको, मराठा युवकांच्या भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांच्या प्रश्नासाठी सतत आंदोलने केली. मार्गदर्शन मेळावे घेतले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक मराठा तरुणांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले.
कुणबी दाखल्यांसाठी शिबिरांचे आयोजन करून अनेक विद्यार्थ्यांना कुणबी दाखले उपलब्ध करून दिले. ग्रामीण भागातील मराठा समाजातील मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वाटप केले. इत्यादी अनेक समाजाच्या उपयोगी कामे मराठा महासंघाच्या माध्यमातून ते सातत्याने करत आहेत.
याबाबत बोलताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस गुलाब गायकवाड म्हणाले की, आगामी काळात या पदाच्या माध्यमातून मराठा तरुणांना उद्योग व्यवसायामध्ये उभे करण्यासाठी शासनाच्या विविध योजना मराठा युवकांपर्यंत पोहोचविण्याच्यासाठी काम करणार आहे. मराठा हा व्यापारी जमात या नावाने ओळखला गेला पाहिजे.
तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि ग्रामीण भागातील मराठा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासन स्तरावर विविध योजनांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.