दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांची सातारा येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी दिलीप पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित असून यापूर्वी ते अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखा येथे कार्यरत होते. पवार यांनी लोणावळ्यातील गाजलेल्या डॉक्टर खंडेलवाल दरोडा प्रकरणात तपास कामात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना २०२२ मध्ये भारत सरकारकडून उत्कृष्ट तपासी अधिकाऱ्यांकरीता दिले जाणारे “केंद्रीय गृहमंत्री पदक” मिळाले आहे.
अतिशय गंभीर गुन्ह्याचा तपास उत्कृष्टरित्या करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. असे कर्तव्यदक्ष अधिकारी इंदापूरला मिळाल्याने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच तालुक्यातील अवैध धंद्यांना चाप बसेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.