संदीप बोडके
थेऊर (पुणे): कोलवडी (ता. हवेली) येथील फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून सात हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या थेऊरच्या “फरार” मंडल अधिकारी जयश्री कवडे यांचा अटकपूर्व जामीन शिवाजीनगर न्यायालयाने फेटाळला आहे.
कोलवडी (ता. हवेली) येथील फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून सात हजार रुपयांची लाच स्विकारताना जयश्री कवडे यांच्या योगेश तातळे व विजय नाईकनवरे या दोन सहकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. मात्र, वरील दोघांना ताब्यात घेतल्याची कुणकुण कवडे यांना लागल्याने, त्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्या. त्यांनी वरील गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून अटकपुर्व जामिनासाठी शिवाजीनगर न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने जयश्री कवडे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी कवडे यांना शासकीय सेवेतून तीन दिवसांपूर्वीच निलंबित केले आहे. अशातच त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने नामंजूर केल्याने कवडे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. जयश्री कवडे यांच्या समोर उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे. त्यामुळे त्या उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला शरण येणार ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
थेऊरच्या मंडल अधिकारी जयश्री कवडे यांच्या प्रशासन काळातील कारकीर्दीवर “पुणे प्राईम न्यूज” ची नजर..
जयश्री कवडे यांना मागील तीन वर्षांच्या काळात तब्बल दुसऱ्यांदा निलबनांच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याने, त्या हवेलीच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील सर्वात वादग्रस्त महसूल अधिकारी ठरल्या आहेत. मागील आठ महिन्यांच्या काळात थेऊर मंडल कार्यालयाचा कारभार जयश्री कवडे यांच्यामुळे जिल्ह्यात गेला होता. “पुणे प्राईम न्यूज”ने या कालावधीत अनेकवेळा जयश्री कवडे यांच्यासह लोणी काळभोरच्या वादग्रस्त तलाठी पद्मिनी मोरे यांच्या गैरकारभाराबाबत आवाज उठवला होता. मात्र, वरीष्ठ अधिकाऱ्यांना प्रोटोकॉलच्या माध्यमातून मिंधे करुन, जयश्री कवडे यांनी आपला कारभार सुरूच ठेवला होता.
जयश्री कवडे यांचे प्रमुख कारनामे…
मौजे भोसरी (ता.हवेली) येथील गट नंबर १२६/१ मधील फेरफार क्रमांक ३३८२२ बाबत मंडलाधिकारी जयश्री कवडे यांनी ०१/०७/२०२२, २२/०७/२०२२ व २२/०८/२०२२ रोजी आदेश पारित केलेला होता. एकाच गावात, एकाच गटात व एकाच फेरफाराबाबत तीनवेळा आदेश पारित केल्याने पुणे जिल्ह्यात जयश्री कवडे यांचा महसूली कारभार रडारवर आलेला होता.
भोसरीमध्येही फेरफार नोंदींना “विलंबाचा कोलदांडा”…
कुळकायदा शाखा यांनी २८ सप्टेंबर २०२२ ला भोसरी मंडलाधिकारी कार्यालयातील एमआयएसची तपासणी केली असता तब्बल २९७ नोंदी प्रलंबित होत्या. तसेच मुदत पूर्ण झालेल्या १२९ नोंदी व त्यातील १४ नोंदींना सुमारे सहा महिने “विलंबाचा कोलदांडा” लावल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे ६७ तक्रार नोंदी केसेस प्रलंबित दिसून आल्या. फेरफार नोंदी अर्धन्यायीक कामकाजामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नसल्याचे स्पष्ट मत कुळकायदा शाखा पुणे यांनी नमूद केले.
“भोसरी येथे कार्यरत असताना जयश्री कवडे यांचे निलंबन”….
उपविभागीय अधिकारी हवेली यांच्याकडील पत्र क्र.आस्था/काविळ/८२७/२०२२ तसेच कुळकायदा शाखा पुणे कडील पत्र क्र. पीटीआय/कावि/२५७३/२०२२ याद्वारे जयश्री कवडे यांच्यावर कर्तव्यात नितांत सचोटी व कर्तव्य परायणता न राखता महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) अधिनियम १९७९ चे नियम ३ मधील तरतूदीचा भंग केल्याचे दिसून येत असल्याचा अहवाल आहे. त्यामुळे १७/१०/२०२२ रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील भाग २ नियम ८ चे पोटनियम (१) (अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करत जयश्री कवडे यांना शासन सेवेतून निलंबित केलेले होते.