पुणे: शहरातील सर्वांत महत्त्वाचा धागा असणाऱ्या कोथरूडमधील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आता पुणे महानगरपालिका महत्त्वाचे पाऊल टाकणार आहे. येथील वाहतूककोंडी टाळण्यासाठी आणि मेट्रोचा प्रवास सुकर करण्यासाठी पौड रस्त्यावर आणखी एक दुमजली उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. कोथरूडमधील कचरा डेपो ते चांदणी चौक या दरम्यान हा दुमजली पूल असणार आहे. पुलाचा पहिला मजला वाहतुकीसाठी आहे, तर त्यावर मेट्रो मार्ग असणार आहे. तर, या पुलासाठी येणारा खर्च महापालिका करणार आहे.
शहरामध्ये कोकण, सातारा, वाकड, हिंजवडी व मुंबईहून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना चांदणी चौकातून कोथरूडमार्गे पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये प्रवेश करता येतो. त्यामुळे सकाळी व सायंकाळी ऐन रहदारीच्यावेळी वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूककोंडीचा प्रश्न कायम आहे.
दरम्यान, यापूर्वी कर्वे रस्त्यावर नळस्टॉप येथे अटलबिहारी वाजपेयी दुमजली उड्डाणपुलाचा पहिला प्रयोग पुण्यात झाला. त्यापाठोपाठ आता गणेशखिंड रस्त्यावर रेंजहिल्स कॉर्नर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंद ऋऋषीं महाराज चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यानंतर आता कोथरूडमधील कचरा डेपो-टीव्हीएस शोरूम ते लोहिया आयटी पार्कपर्यंत होणार आहे. महामेट्रोने त्याबाबतचा आराखडा पुणे महापालिकेला सादर केला आहे. त्यानुसार, महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडून संबंधित प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून तसेच योग्य बदल सुचवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
संबंधित दुमजली पुलामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होण्याची शक्यता आहे. कोथरूड डेपो परिसर, नळस्टॉप, लोहिया आयटी पार्क या ठिकाणांवर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न कायम असतो. अवघ्या दीड किलोमीटरच्या रस्त्यावर छोटे-छोटे चौक, ठिकठिकाणी सिग्नल, रस्त्याभोवती वाढलेले नागरिकरण व वर्दळीमुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडते. त्यामुळे संबंधित मार्गावर दुमजली पूल करण्याची मागणी केली जात होती.
त्यानुसार, संबंधित पुलाची उभारणी होणार आहे. वनाज ते रामवाडी मार्गाचा विस्तार चांदणी चौकापर्यंत होणार आहे, त्यामुळे वनान ते चांदणी चोक मेट्रो मार्गाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला असून हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आला आहे.