पुणे : पुणे शहरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. येरवडा येथील कल्याणीनगर परिसरात पुन्हा एकदा अपघात झाला आहे. कार आणि सायकल यांच्या झालेल्या धडकेत शाळेला सायकलवरून जाणाऱ्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शाश्वत राम बोगाडे (वय-15, रा. कुमार कृती सोसायटी, कल्याणीनगर) असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
ही घटना आज (दि. 20) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर भागातील मेरी गोल्ड सोसायटीसमोर घडली. यापाराकारणी रविकांत रामदिन गौर (वय 37 वर्षे, रा. रोहन निगम अपार्टमेंट, विमाननगर) या वाहनचालकाला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शाश्वत हा त्याच्या सायकलवरून कल्याणीनगर परिसरातून शाळेत निघाला होता. त्यावेळी एका वाहनचालकाने त्याच्या सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात शाश्वत गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, कारचालक रविकांत गौर याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली आहे. कारचालाकाची वैद्यकीय तपासणी केली असता त्यामध्ये मद्यप्राशन केले नसल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आलेले असून अधिक तपास सुरु असल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले.