पुणे : किरकोळ कारणावरून शिविगाळ, मारहाण, खून करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पतीने घर खर्चासाठी पगाराचे पैसे न दिल्याने पत्नीने रागाच्या भरात पतीचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना दिघी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
ही घटना सोमवारी (ता. १८) दुपारी सव्वा एकच्या सुमारास दिघी येथील भारतमातानगर येथे घडली. रवींद्र बाबुलाल नागरे (वय-३९, रा. भारतमाता नगर, दिघी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर भारती रवींद्र नागरे हिच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत मृत रवींद्र नागरे याच्या बहिणीने दिघी पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता. २१) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र नागरे हे दिघी परिसरातील एका पेट्रोल पंपावर काम करत होते. त्यांनी घर खर्चासाठी पगाराचे पैसे दिले नाहीत, या कारणावरुन पती-पत्नीमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. यानंतर आरोपी पत्नीने रवींद्र याला हाताने मारहाण केली. त्याच्या चेहऱ्यावर नखाने ओरबाडून त्याला सोफ्यावर ढकलले. त्यामुळे रवींद्र यांच्या नाकाला, गळ्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता पत्नीने रवींद्र याचा ड्युटीचा शर्ट नाकावर दाबून त्याला ठार मारले.
या प्रकरणी रवींद्र याच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपी पत्नीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिमसेन शिखरे करीत आहेत.