उरुळी कांचन, (पुणे) : शालेय अभ्यासक्रमाबरोबरच दैनंदिन जीवनातील व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता सहावीच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, तुकडीतील विद्यार्थ्यांसाठी आनंदी बाजाराचे आयोजन शनिवारी (ता. 24) करण्यात आले होते.
या आनंदी बाजाराचे उद्घाटन प्राचार्य भारत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, गणितीय संकल्पना लक्षात याव्यात यासाठी अनोखा अनुभव देण्याचा प्रयत्न या उपक्रमांतून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची छोटी दुकाने शाळेच्या प्रांगणात थाटली होती. त्याला विद्यार्थी व शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या आनंदी बाजारामध्ये ४५ ते ५० हजारांची आर्थिक उलाढाल झाली असल्याची माहिती प्राचार्य भोसले यांनी दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वस्तू, भाजीपाला, फळे व खाऊच्या विक्रीतून व्यवसायाचा अनुभव घेतला. ‘भाजी घ्या भाजी…ताजी ताजी भाजी’ अशा चिमुकल्यांच्या आरोळ्यांनी बाजारात रंगत आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी नुडल्स, भेळ, पाणीपुरी, वडापाव, इडली, सांबर, मोमोज, केक, गोळ्या, बिस्किटे, कुरकुरे, लस्सी, आइस्क्रीम, इडली, डोसे, वडापाव, प्लस्टिक भांड्यांचे स्टेल, नर्सरीतील झाडे आदी घरउपयोगी व शालेय वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या.
दरम्यान विद्यार्थ्यांनी जवळपास वीस ते पंचवीस हजार रुपयांची कमाई केली. आनंद बाजार यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य गोविंद जाधव, प्रतिभा हरीभक्त, सुशीला कुंजीर, भावना नाटे, किशोर येवलेकर, अजय पाटील, आबासाहेब सायकर, आदि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.