राहुलकुमार अवचट
NCP यवत : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत दौंड तालुक्यातील भरतगाव येथील आनंद शेलार यांची दौंड तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षपदावर निवड झाल्याने शेलार यांच्यावर तालुक्यातून शुभेच्छाचा वर्षाव होत असून, समाजातील शेवटच्या तळागाळातील घटकाला न्याय मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, असे मत आनंद शेलार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, दौंड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, महिला अध्यक्ष भारती शेवाळे, ज्येष्ठ नेते सतिश खोमणे, पुणे शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे, पुणे ग्रामीण युवकाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, जिल्हा संघटना आणि तालुका संघटनांच्या सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.