पुरंदर: महाराष्ट्रात सध्या विधानसभेची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या प्रमुख आघाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. बंडखोरीमुळे अनेक मतदारसंघ चर्चेत आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघ होय. या विधानसभा निवडणुकीत पुंरदरमध्ये तिरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने माजी प्रशासकीय अधिकारी संभाजी झेंडे यांना ऐनवेळी एबी फॉर्म दिल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे.
सुरुवातीला संभाजी झेंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. तिकीट मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते. मात्र, महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाटायला गेल्याने झेंडे नाराजी व्यक्त करत थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म मिळवत अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण असा पेच निर्माण झाला आहे. याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांना होऊन महायुतीला फटका बसू शकतो.
१५ वर्षे आघाडी धर्मामुळे थांबलेले संभाजी झेंडे हे मैदनात उतरले आहेत. बंडखोरी करत अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून झेंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांना फटका बसण्याची शक्यता आहे. कारण महायुतीमधील मित्रपक्षांची मतं विभागली जाण्याची शक्यता आहे. तसेच तालुक्यात यावेळी खासदार सुळे यांनी लक्ष घातल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची एकगठ्ठा मतं जगताप यांच्या पाठीशी राहण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीकडून येथे बंडखोरी झालेली नाही. त्यामुळे विजय शिवतारे यांना निवडून येण्यासाठी लागणारी काही मते विभागली जात असल्याने याचा अप्रत्यक्ष फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांना होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे विद्यमान आमदार यांची उमेदवारी पहिल्या टप्प्यात जाहीर झाल्याने त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. जगताप यांच्याकडून महाविकास आघाडीकडून महायुती सत्तेत आल्यापासून निधीतून डावलणे, गुंजवणीच्या पाण्यासाठी असहकार, सासवड, जेजुरी नगरपालिका ‘अमृत २’मधून डावलणे, नियोजन समितीत निधीतून डावलणे, रखडलेल्या नोकरभरतीमुळे नागरिक सुविधांपासून वंचित, बारामतीला नदी सुधार योजनेमधून कोट्यवधीचा निधी, पण पुरंदरमध्ये कऱ्हा नदीवरील बंधारे दुरुस्तीसाठी, कऱ्हा नदीलगतच्या धोकादायक गावांच्या संरक्षक भिंतीसाठी निधी नाही यासारखे मुद्दे आक्रमकपणे मांडत आहेत. पुरंदर तालुक्यामध्ये पवार विरोधी मतदारांची संख्या मोठी आहे. यावेळी अजित पवार महायुतीमध्ये आहेत तसेच त्यांच्या पक्षाकडून झेंडे रिंगणात असल्यामुळे ही मतं संजय जगताप यांच्याकडे आकर्षित होऊ शकतात. याचा सरळ फटका शिवतारे यांना बसण्याची शक्यता आहे.
महायुतीकडून माजी मंत्री राहिलेले विजय शिवतारे हे आमदार संजय जगताप यांना आव्हान देणार आहेत. सत्ताधारी पक्षाचे उमेदवार असलेल्या शिवतारे यांच्यासाठीही ही निवडणूक अजिबात फारशी सोपी नाही. शिवतारे यांच्याकडून गुंजवणीचे पाणी, विमानतळ, आंतरराष्ट्रीय बाजार, आमदारांची अकार्यक्षमता आदी मुद्दे प्रभावीपणे मांडले जात आहेत. त्यांच्याकडे हे सर्व मुद्दे असले, तरी सध्याच्या घडीला मतदारांवर त्याचा प्रभाव असल्याचे आपल्याला कोठेही जाणवत नाही.
गेल्या दोन निवडणुकांत गाजलेला गुंजवणी प्रकल्पाचा मुद्दा घेऊनच शिवतारे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी मात्र या मुद्द्याचा प्रभाव ओसरल्याचे पूर्णपणे दिसून येते. पुंरदर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि राष्ट्रीय बाजार हे दोन मुद्दे देखील शिवतारे यांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी आहेत. याचा फायदा त्यांना कितपत होईल, हे सांगणं सध्या तरी कठीण आहे. त्यातच शिवतारे यांच्या मित्रपक्षाने पक्षाने त्यांच्या विरोधात झेंडे यांच्या रूपात उमेदवार दिल्याने महायुतीच्या मतांमध्ये विभाजन होणार आहे. त्यामुळे सध्या माजी शिवतारे हे अडचणीत, तर विद्यमान आमदार जगताप आघाडीवर असल्याचे सध्या प्रथमदर्शनी चित्र आहे.