इंदापूर : “सत्तेच्या गढीवर मुक्काम करण्यासाठी राजकीय पक्षांनी केलेली स्थलांतरे… निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने नेतृत्वात केलेला बदल… पक्षीय पातळीवर झालेली अभद्र युती… अपेक्षा भंग झालेली जनता ….आणि आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी आजी- माजी लोकप्रिय लोकप्रतिनिधींनी मांडलेले डाव- प्रतिडाव खेळाने निर्माण केलेली संभ्रम अवस्था आहे, मात्र “जनतेचं ठरलंय” मतदान कोणाला? खासदार सुप्रिया सुळे यांनी चौथ्यादां निवडून जाण्यासाठी रणसंग्रामात रणसिंग फुंकले आहे, तर सुनेत्राताई पवार या पहिल्यांदाच लोकसभा गाठणार ? सर्वत्र राजकीय दृष्ट्या चर्चा निर्माण करणारा मतदारसंघ म्हणजेच बारामती.
भारतीय जनता पार्टीने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार व त्यांचे सहकारी यांना फोडून युतीचे सरकार राज्यात निर्माण केले. लोकसभेला भाजपची उमेदवार देण्याची क्षमता व कार्यकर्तेची मागणी असताना ही भाजपाने कमळ चिन्हावर लढणारा उमेदवार न देता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा दिली. राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देवून राष्ट्रवादी काँग्रेसचे-शरद पवार पक्षासमोर कडवे आव्हान उभा करून ‘शरद पवार’ यांच्या राजकीय व कौटुंबिक जीवनात प्रश्न निर्माण करण्याची राजकीय खेळी भाजपकडून खेळली गेली. परंतु, शतप्रतिशत भाजप म्हणून वावरणारे संघीय कार्यकर्ते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटाचे माजी मंत्री दत्तात्रय भरणे व त्यांचे कार्यकर्ते यांचे मनोमिलन घडवून आणण्यासाठी राज्य पातळीवरील नेतृत्वाने केलेली कसरत जनतेने पाहिली आहे. राजकारणात काँग्रेस किंवा इतर पक्षांमधील पुढारी फोडून भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची जुनी परंपरा कायम राखली जात आहे.
असे असले तरी आपण चार चार टर्म लोकसभेच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना मदत केली. मात्र, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणजे शरद पवार व अजितदादांनी एकत्र असताना विधानसभा निवडणुकीत आपणास मदत करण्याऐवजी बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून दत्तात्रय भरणे यांना मदत केली. त्यामुळे पाटील यांच्यावर अन्याय झाल्याची भावना, खदखद त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळा व्यक्त केली .
स्वतः अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या घरी येऊन समजूत घालून भाजप, हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांचे कार्यकर्ते यांचा एकत्रित मेळावा घेण्यात आला.
त्यापूर्वी उद्योगपती प्रविण माने यांचा अजितदादा पवार गटातील प्रवेश हा ईडीची भिती दाखवून राजकीय दबाव तंत्राचा वापर करून केला गेला असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच मार्केट कमिटीचे माजी सभापती व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे व कर्मयोगी सहकारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा यांचा शरद पवार गटात झालेला प्रवेश आगामी विधानसभा व नगरपालिका निवडणुकीसाठी केलेली राजकीय चाल असल्याचे बोलले जात आहे.
राजकीयदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार व अजितदादा पवार असे दोन गट स्थापन झाले आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाने मागील लोकसभा निवडणुकीत घेतलेली ५००००० मते आणि आता अजित पवार गटाची मते हे एकत्र धरून होत असलेल्या बेरजेचे ‘ डिव्हाईड अँण्ड रूल’ या तत्वाने सुनेत्रा पवार यांचे पारडे जड वाटत असले, तरी सर्व सामान्य जनतेला अजित पवार व दत्तात्रय भरणे यांनी राजकीय फायदासाठी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतदारांबरोबर केलेली प्रतारणा आवडलेली नाही. त्यामुळे नेते राजकीय स्वार्थासाठी जरी एकत्र आले असले तरी देखील इंदापूर तालुक्यातील सुज्ञ जनतेने आपल्या मनातील खासदार निवडलेला आहे.
८२ व्या वर्षी शरद पवार यांना एकाकी राजकारणात सोडून जाणं, राजकारणासाठी पवार कौटुंबियात निर्माण केलेली फुट, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आजी-माजी आमदार, मंत्री यांनी एकमेकांवर राजकीय फायदा लाटण्यासाठी आखलेली कुरघोडीची रणनिती….. स्वार्थासाठी मागे पुढे करणारी ठेकेदार लाॅबी ….. त्यातून निर्माण झालेली मलिदा गॅंग …. भ्रष्टाचार प्रकरणे आणि पत्रकाराविषयी केलेले वक्तव्य, तेच तेच चेहरे व तेच पुढारी म्हणून मिरवणारे ठेकेदार … भाजपाने क्षमता असतानाही कमळ चिन्हावर उभा न केलेला उमेदवार, अजित पवार यांनी पूर्वी केलेली राजकीय भाषणे …मराठा आरक्षण, धनगर, ओबीसी, मातंग समाजाला मिळालेली राजकीय वागणुक हे जनतेच्या मनात रोष निर्माण करण्यासाठी पुरेशी कारणे आहेत.
तसेच राजकारणात दिवसेंदिवस राजकीय परिस्थितीत होत असलेल्या बदलामुळे अटीतटीची लढत होऊन सुप्रिया सुळे यांना जास्तीचे मतदान मिळवून देण्यासाठीचे मार्ग मोकळे झालेचे चित्र आहे. परंतु, आगामी काळात धनशक्ती विरुध्द जनशक्ती असा संघर्ष पाहायला मिळाल्यास त्यात वावगे असे काही नाही. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी आता लोक मतदान करण्यासाठी उत्साहात पुढे येतील? हा खरा प्रश्न आहे.