शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे एका हॉस्पिटलसाठी भाड्याने दिलेल्या इमारतीचा व्यवहार पूर्ण न झाल्याने मूळ मालकांनी सदर व्यक्तीला नोटीस पाठवून इमारतीला टाळे लावलेले असताना काही महिलांसह इसमांनी सदर इमारतीत अनधिकृतपणे प्रवेश करुन ताबा घेण्याचा प्रयत्न केलाचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याबाबत अश्विनी शांतीलाल तांबे (वय-४५, रा. सणसवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून राजेंद्र पुंजाजी पगार (रा. सणसवाडी, ता. शिरुर, जि. पुणे), लताबाई बुवाजी शिरसाट, बेगम उस्ताद सय्यद दोघी (रा. पेरणे फाटा, ता. हवेली, जि. पुणे), रामकृष्ण रामचंद्र गिरमकर (रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे), प्रवीण रावसाहेब ढवळे (रा. वढू बुद्रुक, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्यासह तीन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अश्विनी तांबे यांची इमारत एका डॉक्टरच्या ओळखीने राजेंद्र पगार यांना भाडे तत्वावर दिली होती. या इमारतीचा भाडे करारनामा केला असता आघाऊ रकमेचे चेक पगार यांनी तांबे यांना दिले होते. मात्र, सदर चेक बँकेत भरल्यानंतर वटले नसल्याने पगार यांनी चेक परत द्या मी रोख रक्कम देतो असं म्हणून चेक परत घेतल इमारतीमध्ये काम चालू केले.
मात्र, रक्कम देण्यास टाळाटाळ करु लागल्याने तांबे यांनी राजेंद्र पगार यांना नोटीस पाठवत सदर इमारतीला काही दिवसांपूर्वी कुलूप लावले. त्यांनतर २१ जुलै रोजी अचानक काही महिला व इसम सदर इमारतीचे कुलूप तोडून आतमध्ये आल्याचे तांबे कुटुंबांना सीसीटीव्हीच्या नोटिफिकेशन द्वारे समजले.
त्यानंतर तांबे यांनी संबंधितांना तुम्ही इथे कशासाठी आलात ? माझ्या इमारतीचे लॉक का तोडले? असे विचारले असता, त्यातील एका महिलेने तिचे नाव लताताई सिरसट असे सांगून आम्हाला राजेंद्र पगार यांनी पाठवले असल्याचे सांगितले. यावेळी तांबे यांनी पोलीस कंट्रोलरूम ला फोन केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी महिला व इसमांना ताब्यात घेतले. मात्र त्यातील तीन जण पळून गेले असून शिक्रापूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.