लोणीकंद, (पुणे) : रात्री उशिरा पर्यंत हॉटेल चालू ठेवल्याने लोणीकंद पोलीसांनी हॉटेलवर कारवाई केली. कारवाई केल्यामुळे चक्क हॉटेल मालक व त्याच्या कामगाराने पोलीस ठाण्याच्या आवारात स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही घटना १ मार्च रोजी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या आवारात घडली. याप्रकरणी हॉटेल मालक व कामगारावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हॉटेलमालक सत्यवान हौशीराम गावडे (वय ३४, रा. उबाळेनगर, वाघोली), कामगार राम अशोकराव गजमल (वय – २२, रा. उबाळेनगर, वाघोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस हद्दीत पोलीस गस्त घालीत असताना हॉटेल “न्यू प्यासा” रविवारी (ता. ३१) रात्री दीड वाजल्यानंतर देखील सुरू होते. यावेळी रात्रगस्त अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे व त्यांच्या पथकाने संबंधित हॉटेलच्या कामगारावर हॉटेल उशिरापर्यंत चालू ठेवल्या प्रकरणी रविवारी रात्री गुन्हा दाखल केला.
याचा जाब विचारण्यासाठी हॉटेल मालक कामगारांसह लोणीकंद पोलीस स्टेशन येथे सोमवारी (ता. ०१) सायंकाळी पाच वाजता आले होते. “माझ्या हॉटेलवर कारवाई केल्यास मला आत्महत्या करावी लागेल” असे म्हणून धमकाऊ लागला. हॉटेल नियमानुसार चालवावे लागेल तसेच आत्महत्या करणे हा देखील गुन्हा असल्याची माहिती त्यांना पोलिसांनी दिली. हॉटेल मालक व कामगार यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन आरडाओरड सुरू केली. तसेच अंगावर दोघांनीही ज्वलनशील पदार्थ ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असणारी ज्वलनशील पदार्थाची बाटली काढून घेतली. तसेच त्यांना आत्महत्या करण्यापासून त्वरित परावृत्त केले. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी हॉटेल मालक व चालकाविरुद्ध पोलीस स्टेशनच्या आवारात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
काही दिवसापूर्वी अशीच एक घटना वाघोली पोलीस चौकीत देखील घडली आहे. पोलीस कारवाई करीत नसल्याने वाघोली पोलीस चौकीत स्वतःला पेटवून घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता या घटनेची पुनरावृत्ती पोलिसांच्या सतर्कतेणे टळली आहे.