पुणे : ‘शादी डॉट कॉम’ या मॅट्रिमोनियल साईटवरुण तरूणाशी झालेली ओळख एका तरुणीला चांगलीच भोवली. लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने संबंधित तरुणीशी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. प्रत्यक्ष लग्न करण्याची वेळ आली त्यावेळी त्याने लग्नास ठाम नकार दिला. वडगाव शेरी परिसरात २०२० ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला.
याबाबत दिघी येथे राहणाऱ्या एका ३४ वर्षीय तरुणीने रविवारी (ता. ४) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रदीप तुकाराम जाधव (वय ४०, रा. दत्तनगर, पुसखेड, ता. वाळवा जि. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने ‘शादी डॉट कॉम’ या संकेतस्थळावर विवाहासाठी नावनोंदणी केली होती. तिथे तिची ओळख आरोपी प्रदीप जाधव याच्यासोबत झाली. आरोपी प्रदीप जाधव हा भारतीय लष्करात नायब सुभेदार पदावर कार्यरत आहे. दरम्यान, प्रदीप याने पीडित महिलेला आपला घटस्फोट झाल्याची खोटी माहिती दिली. गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला. लग्नाचे आमिष दाखवून महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठवले. प्रत्यक्षात लग्न करण्याची वेळ आली तेव्हा लग्नास नकार दिला.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी प्रदीप जाधव याच्या विरोधात तक्रार दिली. दिघी पोलिसांनी हा गुन्हा चंदनगर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे करीत आहेत.