उरुळी कांचन, (पुणे) : उच्च माध्यमिक शिक्षणाचे व्यावसायीकरण या योजनेचा विस्तार करून जर्मनीतील बाडेन-वूटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये 30 विविध तांत्रिक कोर्स पूर्ण केलेल्या युवकांना जर्मनीमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या वरिष्ठ निरीक्षक (RTO) अमृता भालशंकर यांनी दिली.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एलाईट चौकाशेजारी असलेल्या मैदानात बुधवारी (ता. 25) आरटीओ कम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या तरुणांना व नागरिकांना हि माहिती देण्यात आली. यावेळी भालशंकर बोलत होत्या.
प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक अमृता भालशंकर, समीर शिरोडकर, मोटार वाहन उपनिरीक्षक प्रशांत पोतदार, कर्मचारी, दत्तात्रय माळी, उरुळी कांचन येथील राजेंद्र बगाडे, महेश फलटणकर, कुंभारकर आदी नागरिक व परिसरातील तरुण – तरुणी उपस्थित होत्या.
युरोपिय युनियनमधील बहुतांश देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहेत. मात्र, काही वर्षांपासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये कुशल कामगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपियन युनियनमधील देशांना करता यावा, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्रासोबत जर्मनीतील बाडेन-बुटेनबर्ग राज्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी अथवा अर्ज करण्यासाठी क्युआर कोड स्कॅन करून अर्ज दाखल करावा. तसेच अधिक माहितीकरिता कार्यालयात स्थापित केलेल्या मदत कक्ष येथे प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
30 प्रकल्पांतील मनुष्यबळ आवश्यक
नर्सिंग, लॅब असिस्टंट, रेडिओलॉजी असिस्टंट, डेंटल, केअर टेकर, फिजिओथेरपिस्ट, डॉक्युमेंटेशन ॲण्ड कोडिंग, लेखा आणि प्रशासन, इलेट्रिशियन, अक्षय ऊर्जेसाठी वीजतंत्री, औष्णिक वीजतंत्री, पेंटर, सुतार, गवंडी, प्लंबर, मशिनिस्ट, वाहनचालक, सुरक्षारक्षक, टपाल सेवा, सामान बांधणी व वाहतूक, पॅकर्स ॲण्ड मूव्हर्स, वेटर्स, रिसेप्शनिस्ट, कूक, हॉटेल व्यवस्थापक, लेखापाल, सफाई कामगार या प्रकल्पांतील मनुष्यबळ आवश्यक आहे.
शासन देणार पासपोर्ट अन् व्हिसा
ज्या कुशल युवकांची जर्मनीत जाण्यासाठी निवड होणार आहे, त्या युवकांना महाराष्ट्र शासनाकडून पासपोर्ट आणि व्हिसा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जर्मनीमध्ये संबंधित विद्यार्थ्याला कुठे रोजगाराची संधी उपलब्ध आहे, तेथील कंपनी, संस्थेशी टायअप करून दिले जाईल. यासाठी देशाचे राजकीय दूतावास सहकार्य करणार आहे.