उरुळी कांचन, (पुणे) : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपताच आता पूर्व हवेलीसह गावागावांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वेध लागले आहेत. ग्रामीण भागाचे नेतृत्व करणारी कार्यशाळा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. त्यामुळे सर्वत्र निवडणुकांच्या गप्पांचे फड रंगू लागले आहेत. या निवडणुका कधी होणार? हे अद्याप स्पष्ट नसले, तरी कार्यकर्ते मात्र जोरदार तयारीत आहेत.
विधानसभा निवडणुकीत पक्षाचे निष्ठेने काम केल्याचा मोबदला म्हणून अनेक कार्यकर्त्यांना आता झेडपी व पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न पडू लागले आहे. राज्यातील एकूणच राजकीय वातावरण पाहता लवकरच घोषणा होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.
हवेली तालुक्यातील 23 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याचा मोठा फटका तालुक्याला बसला आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही किती गटात होणार याचे गणित महायुती सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. महायुती व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जुन्या गटांनुसार अंदाज बांधून नवीन गट रचनेनुसार आपले ‘स्थानिक‘चे राजकीय फासे फेकताना दिसत आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार, जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गण वाढणार की कमी होणार? याची चर्चा अद्याप सुरु आहे.
जुन्या व नव्या गटानुसार फासे…
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेसाठी 82, तर पंचायत समित्यांसाठी एकूण 164 गण निश्चित केले होते. यामुळे जिल्हा परिषदेचे नवीन 7 गट आणि पंचायत समित्यांचे नवीन 14 गण वाढले होते. हवेली तालुक्यातील तब्बल 7 गट आणि 14 गणांवर संक्रांत आली होती. नवीन रचनेत हवेली तालुक्यात आता केवळ 6 गट आणि 12 गण निश्चित झाले होते.
प्रस्थापितांना बसणार धक्का
अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या असून सध्या प्रशासकराज सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील अगोदर असलेल्या सदस्यांचे राजकीय वजन कमी झाले. तेथील राजकीय समीकरणे देखील बदलून गेल्यामुळे प्रस्थापितांना पुन्हा नव्याने तेथे जम बसविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
सर्वच पक्षांचा लागणार कस
2022 मध्ये शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणात आमूलाग्र बदल झाले. त्यानुसार जिल्ह्यात, तालुक्यात देखील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची दोन गटांत विभागणी होऊन कार्यकर्ते विभागले गेले आहेत. अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने समीकरणे बदलली आहेत. सोबतच प्रत्येक पक्षांची मतपेढी देखील बदललेली असल्याने सर्वच राजकीय पक्षांचा या निवडणुकीत कस लागणार आहे.
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या काम करणाऱ्या तरुणांनी लढवाव्या. तरुणांकडून कामे होत असल्याने आगामी निवडणुकीसाठी तरुण पिढीतील अनुभवी तरुणांना या निवडणुकीत सर्वच पक्षांनी संधी द्यावी.”
– अलंकार कांचन, सदस्य, जिल्हा नियोजन समिती
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवण्यासाठी परिसरातील गावांमध्ये सरपंच व उपसरपंच पद सांभाळणारे तरुण मोठ्या प्रमाणात पुढे आले आहेत. त्यानुसार कमी मतदान असलेल्या गावातील तरुण वंचित राहणार आहेत. महाविकास आघाडीच्या काळात जे गण – गट ठेवण्यात आले आहेत, तेच राहावेत. त्यानुसार निवडणुका घेण्यात याव्यात. सोयीनुसार राजकारण करू नये.
– सुरज चौधरी, माजी सरपंच-पेठ
आमचा पूर्वीपासूनच घराणेशाहीला विरोध आहे. ज्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवल्या आहेत, त्या सर्वांना आमचा विरोध आहे. नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी. शेवटी आमचे नेते अजित पवार जो निर्णय घेतील, तो मान्य आहे.
-जितेंद्र बडेकर, माजी उपसरपंच-उरुळी कांचन