यवत: अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका यांच्या वतीने केडगाव येथील महावितरणच्या विद्युत विभागाला आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून यावेळी विविध प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले. आज (दि. २१ ) केडगाव येथील विद्युत विभागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने व विद्युत अपघाताची संख्या थांबत नसल्याने अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे केडगाव महावितरणचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच खांबावरील विद्युत तारा खाली आल्या असून अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती आहे. अशा ठिकाणची पाहणी करून ती कामे तात्काळ दुरुस्त करून घ्यावेत. यामुळे जर सामान्य नागरिकांची जीवित किंवा वित्तहानी झाली, तर याची जबाबदारी महावितरण कंपनीची राहील. तसेच याबाबत कारवाई न केल्यास अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुकाच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, अशी माहिती तालुका युवक अध्यक्ष गणेश दिवेकर यांनी दिली.
तसेच गेल्या आठवड्यामध्ये दापोडी येथे झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत मिळावी, असे जिल्हा युवक अध्यक्ष मयूर सोळसकर यांनी सांगितले. यावेळी पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुरज चोरगे, दौंड तालुका उपाध्यक्ष सचिन गुंड, दौंड तालुका मराठा महासंघ संलग्न बहुजन आघाडी अध्यक्ष दिनेश गडदे, कोषाध्यक्ष विकास टेमगिरे, युवक संपर्क प्रमुख चंद्रकांत आखाडे, सुरेश तळेकर, ईश्वर पवार,पांडुरंग काळे, सोनबा ढमे, सतीश खताळ, प्रथमेश रुपनवर, ओंकार चव्हाण, समाधान दाणे, सार्थक शेंडगे ,साहिल चव्हाण, प्रवीण लोखंडे , अभिषेक चव्हाण, संदीप टेंगले यांसह तसेच मराठा महासंघाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.