संदीप टूले
केडगाव : मागील काही दिवसांपासून प्रांत कार्यालयाच्या कोनशिलेवरून दौंड तालुक्यात राजकारण पेटल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार गटाकडून यासाठी प्रांत कार्यालयात आंदोलनही करण्यात आले होते. अखेर महसूल आणि बांधकाम विभाग प्रशासनाने सोमवारी (ता. ८) रात्री उशिरा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख असलेली दुसरी कोनशिला उद्घाटन केलेल्या कोनशिलेच्या शेजारी बसवली. यामुळे दौंडच्या प्रांत कार्यालयात आता दोन कोनशिला दिसत आहेत.
दौंडच्या नवीन प्रांत कार्यालयाचे उद्घाटन १० डिसेंबर रोजी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर येथे कोनशिला उभारण्यात आली. या कोनशिलेवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे यांची नावे कोरली होती. या उद्घाटनाच्या कोनशिलेवरून मागील काही दिवसांपासून दौंड तालुक्यात राजकारण तापले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा या कोनशिलावर नामोल्लेख केला नसल्याने प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांना याबाबत लेखी पत्र देऊन, याबाबत खुलासा करावा अशी मागणी केली होती. मात्र, प्रांताधिकारी कार्यालयाकडूनअपेक्षित उत्तर न मिळाल्याने वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष उत्तम आटोळे, दौंड शुगरचे संचालक विरधवल जगदाळे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयाच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली होती. रात्रभर त्यांनी त्या कार्यालयात आंदोलन केले.
या आंदोलनामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. या आंदोलनानंतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनीही पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलकांवर टीका केली. याला उत्तर म्हणून राष्ट्रवादीने प्रत्युत्तराची पत्रकार परिषद घेतली होती. पालकमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख राजकीय दबावामुळे जाणूनबुजून टाळण्यात आला. या सर्व प्रकारामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला होता.
दरम्यान, कोनशिलेच्या नामोल्लेखामुळे राज्यात सत्तेत असलेला अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षात श्रेयवादावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. एकमेकांच्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन ते एकमेकांची बाजू पोटतिडकीने मांडत होते. कोनशिलेवरून तापलेल्या राजकारणामुळे प्रशासकीय अधिकारी मात्र चांगलेच अडचणीत आले होते.
अखेर प्रशासनाने उद्घाटन केलेल्या कोनशीलेशेजारीच सोमवारी (ता. ८) रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाने दुसरी कोनशिला बसवली आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर बारामती विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचाही नामोल्लेख या कोनशिलेवर करण्यात आला.