बारामती : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबत अप्रत्यक्षपणे विधान केले होते. त्यावर आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. ‘पाणी देण्यासाठी मी जर कोणाला धमकावले असते तर जनतेने मला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता, जर कोणी धमकावलेच असेल तर पोलिसांत तक्रार दाखल करावी, पोलिस त्याबाबतची कार्यवाही करतील’, असे अजित पवार म्हणाले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुरंदर आणि बारामती तालुक्यांतील गावांचा दुष्काळी दौरा सोमवारी केला होता. या दौऱ्यादरम्यान सुपे येथे झालेल्या सभेत पवार यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. ‘दमबाजीला घाबरू नका’, असे ठणकावून सांगितले होते. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, ‘संस्था चालविताना संस्थेच्या पद्धतीनेच त्या चालवाव्या लागतात. राजकारण करताना राजकारणाच्या पद्धतीनेच ते करावे लागते. पाणी देण्यासाठी मी जर कोणाला धमकावले असते तर जनतेने मला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता. जर कोणी धमकावलेच असेल तर पोलिसांत तक्रार दाखल करावी, पोलिस त्याबाबतची कार्यवाही करतील’.
बारामती लोकसभा मतदारसंघातील काही नेत्यांमध्ये नाराजी आहे का? त्यावर अजित पवार म्हणाले की, देशातील अनेक ठिकाणच्या निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने काही नेत्यांची नाराजी असते. त्यानुसार, त्यांना समजावून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. मी लोकप्रतिनिधी या नात्याने नाराजांना समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची नाराजी दूर झाली आहे. मात्र, लोकशाहीमध्ये ज्याचा त्याचा प्रश्न असतो.
आम्ही बोलतो तसे वागतो…
अजित पवार पुढे म्हणाले, ‘विजय शिवतारे यांच्या मागण्यांबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर काही भूमिका मांडली होती. त्याच वेळेस त्यांच्या भागात त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही 11 एप्रिलला होणाऱ्या त्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहोत. आम्ही बोलतो तसे वागतो. बदलत नाही. त्याप्रमाणे आम्ही शब्दाला जागून तिघेही तेथे जाणार आहोत’.
एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा स्वगृही अर्थात भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले, प्रत्येकाने काय करावे हे ज्याचा त्याचा अधिकार आहे. राजकारणात अशा घटना घडत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला अधिकार दिला आहे. त्यामुळे ते तो बजावतात.
लोकांना पटेल असे तरी बोलावं; संजय राऊतांना टोला
यंदाची लोकसभेची लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावर अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यांनी पत्रकारांनाच ‘तुम्हाला तरी खरंच अस वाटतं का?’ असा प्रतिप्रश्न केला. ‘एक वेळ नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही लढाई आहे, असे ते म्हणाले असते तर ते मान्य करता आले असते. पण त्यांचा पक्ष महाराष्ट्राबाहेर नाही. त्यामुळे असे होणार नाही. लोकांना पटेल असे तरी त्यांनी बोलावे’, असा टोला संजय राऊत यांना लगावला.