पुणे : पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजित पवार याचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बैलगाडी आणली होती. यावेळी अजित पवार यांना बैलगाडीमध्ये बसण्याचा आग्रह कार्यकर्ते करत होते, मात्र अजित पवार यांनी बैलगाडीत बसणे टाळले.
चालत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले. नंतर त्यांनी या कार्यक्रमामध्ये बोलताना आपण बैलगाडीत का बसलो नाही? याचं गमतीदार स्पष्टीकरण दिलं. त्यासोबतच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. ते पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
आता बैलगाडी पुढच्यावेळी घोडा; काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले, आज युवकांनी खूप चांगलं स्वागत केलं. स्वागत करत असताना मला म्हणाले दादा तुम्ही बैलगाडीतच बसा. तेव्हा मी त्यांना म्हटलो अरे बैलगाडी माझ्या आजोबाच्या काळात होती, वडिलांच्या काळात होती. थोडी आम्ही चालवली अन् नंतर ट्रॅक्टर आलं. बैलगाडी पुन्हा मागे कुठे घेऊन चाललात. मी बैलगाडीत बसलो नाही तर का बसलो नाही? तुम्हाला नाराज करायचं म्हणून बसलो नाही असं नाही. तुम्ही फेटा घाला म्हणाले मी घातला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ती बैलं खिलार होती. वरून जेसीबीमधून फूलं पडत होती, फूलं जर बैलांच्या अंगावर पडली आणी बैल जर बिथरले तर काय झालं असतं? किंवा त्या रेटा रेटीमध्ये कोणी बैलांच्या अंगावर गेलं असतं तर काय झालं असतं, अजित पवारही गेले असते आणि तिसरंच काहीतरी घडलं असतं. तर इथंच श्रद्धांजली वाहावी लागली असती, कार्यक्रम रद्द करावा लागला असता. आता पुढच्या वेळेस म्हणून नका घोडा घेऊन येतो, घोडा तिकडे आणि मी इकडं अशा मिष्किल शब्दात अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली.