पुणे : निवडून येणाऱ्याला माहितीय कोण कोणामुळे निवडून आलं आहे ते, अन् निवडून आणणाऱ्यालाही माहितीय कोण कोणामुळे निवडून आलंय ते. अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव ना घेता केली. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
तसेच पुढे बोलताना म्हणाले, राज्य मागासवर्गीय आयोग हे स्वायत्त आहे आणि त्यांच्यावर कुठलाही दबाव नाही. त्यात आम्ही कुठलाही हस्तक्षेप करत नाही. त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर तयारी झालेली आहे. महापालिका आणि इतर सगळ्या यंत्रणांना सूचना दिल्या आहेत, असे अजित पवार म्हणाले.
मी असले आलतू-फालतू उत्तरं द्यायला बांधील नाही : अजित पवार
राष्ट्रवादीत फूट पडलेली नव्हती त्यावेळी दादा पक्षात दादागिरी करायचे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, मी कामाचा माणूस आहे. सकाळी सहाला कामाला सुरूवात करतो. मी असले आलतू-फालतू उत्तरं द्यायला बांधील नाही. किरकोळ किरकोळ प्रश्न ज्याला काही अर्थ नाही, दोन दिवस चघळायचं-चघळायंच त्याचा चोथा करायचा. तसेच पुढे बोलताना राज्यातील मागासवर्ग आयोगावर दबाव नसल्याचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ते राज्याचे प्रमुख : पवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ महिने मुख्यमंत्रीपद आपल्याकडे असल्याचे विधान केले होते. त्यावर प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे. ते राज्याचे प्रमुख आहेत. राज्याच्या प्रमुख पदावर राहण्यासाठी लागणारं बहुमत त्यांच्या पाठिशी आहे.