पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडक शैलीसाठी ओळखले जातात. आज (दि. २१) पदाधिकाऱ्यांना पुन्हा या गोष्टीचा प्रत्यय आला. त्याच झालं असं की, पुण्यात पूर्व हवेली विचारमंचच्या शिष्टमंडळाने पवार यांची यशवंत सहकारी कारखान्याबाबत भेट घेतली. यावेळी हवेली तालुक्यातील शेतकरी अर्थकारणाचा कणा असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना गेले तेरा वर्षांपासून बंद आहे. कारखान्यावर असलेल्या अतिरिक्त कर्ज व त्यामुळे आर्थिक संकटात असल्या कारणाने सदर कारखाना बंद आहे. तरी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने साखर कारखान्याची काही जागा विकत घेऊन बंद असलेला साखर कारखाना चालू करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती सदर शिष्टमंडळाने केली.
त्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार म्हणाले की, मी निर्णय घेणार नाही. सगळं खापर माझ्या नावावर फोडाल. चांगलं झालं की, दादांनी चांगलं केलं आणि वाईट झालं, तर त्या कळतच नव्हतं. आमचं वाटोळं केलं. त्यामुळे बहुमतानी संचालक बोर्डाने विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी आणि त्यामध्ये त्या सभेत कुठले विषय आहेत, ते मला दाखवा. आम्ही साखर आयुक्तांचा एक प्रतिनिधी तिथे पाठवू आणि ते तिथे त्या सभेचे व्हिडिओ शूटिंग वगैरे घेतील.
त्यानंतर तुम्हाला पर्याय द्यावे लागतील. कारण कारखान्याच्या भागामध्ये आता सगळं नागरीकरण होणार आहे. जसं पूर्वी मगरपट्ट्याचा ऊस होता, सगळा संपला. अमनोराच्या येथे ऊस होता, तोही संपला. आता सगळ्यांचे ऊस सगळे संपलेले आहेत. सर्वत्र नागरीकरण मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. आमचा प्रयत्न चाललेला होता की, तिथं मार्केट कमिटीच एक नवीन मार्केट डेव्हलप करायचं. त्यामधून जे पैसे उभे राहतील त्याच्यातून तेवढ्याच कॅपॅसिटीचा दुसरा कुठला कारखाना आपल्याला मिळत असेल, तर तो त्या ठिकाणी घ्यायचा का? अशा प्रकारची चर्चा सुरू झाली, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पूर्व हवेली विचारमंचच्या शिष्टमंडळात तात्यासाहेब काळे, रामदासभाई चौधरी, गुलाबराव चौधरी, आप्पासाहेब काळभोर, राजेंद्र खांदवे, संदिप गोते, सुभाष काळभोर यांचा समावेश होता.