उरुळी कांचन, (पुणे) : शिवाजीनगर ते लोणी काळभोर प्रस्तावित असलेली मेट्रो पुढील काळात उरुळी कांचनपर्यत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उरुळी कांचन येथे दिली. शनिवारी (ता. २०) उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी सदर माहिती दिली.
यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आंनद भोईटे, पोलीस उपयुक्त आर. राजा, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, दौंडचे आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, अमित बाबा कांचन, विविध गावाचे आजी – माजी सरपंच, विविध गावाचे पोलीस पाटील, पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि उरुळी कांचन परिसरातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
दरम्यान आपल्या रोखठोक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या सडेतोड स्वभावाचे दर्शन घडविले. पोलीस ठाण्यात कोणताही पुढारी असो किंवा कोणतेही नागरिक, सर्वांना समान न्याय द्या. जो पोलिसांच्या कामात अडथळा ठरतोय, त्याच्यावर सरळ कारवाई करा, असे आदेश अजित पवार यांनी पोलिसांना दिले आहेत.”
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “पोलिस दलात ५० टक्के ऐवजी १०० टक्के नोकर भरती करणार आहे. माजी गृहमंत्री आरआर पाटील यांनी त्यावेळेस ६० हजार पोलिसांची भरती केली होती. त्यानुसार या वर्षीही राज्यात १०० टक्के पोलीस भरती करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर याला कॅबिनेटची मिळणार मंजुरी मिळेल.”
एक एकर जागा पोलीस स्टेशनला हस्तांतरीत करण्याच्या सूचना..
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आज अशीच त्यांच्या कामाची बेधडक स्टाईल नागरिकांना पहायला मिळाली. उरुळी कांचन येथील इरिगेशनची एक एकर (४० गुंठे) जागा पोलीस स्टेशनला हस्तांतरीत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. यामुळे लवकरच उरुळी कांचन पोलिस स्टेशनला आणखी एक एकर जागा मिळणार आहे. याबाबत हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांना पुढील कार्यवाहीसाठी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
उरुळी कांचन येथील माजी सरपंच संतोष कांचन यांनी इरिगेशनची जागा पोलीस स्टेशनला वर्ग करण्यासंदर्भात मागणी केली. दरम्यानच्या काळात पोलीस अधिक्षक यांनी येऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केली होती. ग्रामपंचायतीने संबंधित जागा पोलीस स्टेशनला देण्यासाठी प्रस्ताव दिलेला होता. त्यावर इरिगेशन जागेचा सातबारा पाहा, तो सातबारा तातडीने पोलिस स्टेशनच्या नावावर झाला पाहिजे व पोलिस स्टेशनला जागा मिळाली पाहिजे, आदेश अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता..
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मार्च किंवा एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल असा माझा अंदाज आहे. तर एप्रिल महिन्याच्या शेवटी लोकसभेच्या निवडणुका होतील, असेही अजित पवार यांनी सांगितले.
हातभट्टी सुरु आहे का? थेट नागरिकांना प्रश्न
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे उद्घाटन अजित पवार यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी थेट लोकांना विचारले की, येथे हात भट्टी सुरु आहे का? त्यावर लोकांनी हो असे उत्तर दिले. त्यानंतर पवार म्हणाले की, लोक आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर अवैध धंद्याबद्दल सांगायला लागले आहेत. त्याची दाखल घेऊन पोलिसांनी अवैध धंद्यांना आळा घातला पाहिजे. तसेच पोलिस स्टेशनमध्ये काम करताना कोणताही भेदभाव करू नका, सत्ताधारी पक्षाचा असो वा विरोधी पक्षाचा, चुकला तर कारवाई झालीच पाहिजे. पोलिसांचा वचक असला पाहिजे, गुन्हेगारांचं उदात्तीकरण थांबलं पाहिजे, अशा शब्दांत अजित पवार यांनी पुणे पोलिसांना कानपिचक्या दिल्या.